Bharati Pawar : 'माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही', केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे वक्तव्य
Nashik Bharati Pawar : 'माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही' असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी केले आहे.
नाशिक : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आदिवासी बांधवांबरोबरच आमदार खासदार देखील धनगरांना (Dhangar Reservation) आदिवासींमधून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. आमदार नरहरी झिरवाळ यांनी 25 आदिवासी आमदार राजीनामा देणार असल्याचे विधान केले होते. या प्रश्नी भारती पवार देखील आक्रमक झाल्या असून 'माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही' असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच गाजत असून मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी देखील आंदोलन करण्यात आले. आदिवासींमधून आरक्षण मिळावे यासाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चौंडीत 21 दिवस उपोषण करण्यात आले. मात्र त्यानंतर आदिवासी समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यातच काल विविध संघटना एकत्र येत तसेच आदिवासी आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यासह हिरामण खोसकर, जेपी गावित आदींनी एकत्र येत विराट मोर्चाचे काढण्यात आला. यावेळी नरहरी झिरवाळ यांनी धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देऊ नये अन्यथा आम्ही सगळे आमदार राजीनामा देऊ, असा इशारा यावेळी दिला. यानंतर आज केंद्रीय भारती पवार यांनी देखील झिरवाळ यांनी मागणीला दुजोरा देत वेळ आल्यास आम्ही देखील पदाचा त्याग करू असे सूतोवाच दिले आहेत.
यावेळी भारती पवार म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी म्हणून आदिवासी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्रित आहोत. दिल्लीत (Delhi) देखील आमच्या खासदारांची बैठक झाली होती. आमदार आणि खासदार आमचं एकच मत आहे. आदिवासी समाजाची प्रगती होण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला (Dhangar Aarakshan) आरक्षण द्यावे. आमच्या समाजामुळे आमची ओळख आहे. माझी गरज माझ्या समाजाला होणार नसेल, तर पदाला अर्थच नाही. वेळ आली तर आम्ही समाजासाठी पदाचा देखील त्याग करू असा इशारा भारती पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आरक्षण मागणीवरून आदिवासी आमदार, खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदार झिरवाळ काय म्हणाले?
आमदार झिरवाळ म्हणाले की, आम्हाला 47 जाती म्हणून आरक्षण मिळाले, पण 48 वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. असं जर होणार असेल तर आम्ही मंगळवारी पक्ष प्रमुख यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यतील सर्वच 25 आदिवासी आमदार राजीनामा देऊ, आम्ही 25 आमदारांनी राजीनामे दिले तर कोणतेच सरकार राहणार नाही, असे सूचक वक्तव्य आमदार झिरवाळ यांनी केले. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी काल नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी सह अनेक तालुक्यातून आदिवासी बांधवासह महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
इतर महत्वाची बातमी :
Nashik Adivasi Morcha : आदिवासी समाजाचा मोर्चा, धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी