Nashik Malegaon Crime : 'जिथं दशहत केली, तिथंच पोलिसांनी सराईत गुंडाची काढली धिंड', मालेगाव पोलिसांनी दिला निर्भीडतेचा संदेश
Nashik News : मालेगाव (Malegaon) पोलिसांनी संशयितांची ज्या भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती, तिथेच बेड्या घालून धिंड काढत त्यांच्या गुंडगिरीचे भूत उतरविले.
![Nashik Malegaon Crime : 'जिथं दशहत केली, तिथंच पोलिसांनी सराईत गुंडाची काढली धिंड', मालेगाव पोलिसांनी दिला निर्भीडतेचा संदेश Nashik Latest news crime malegaon police takes parade of nashik gangsters on road maharashtra news Nashik Malegaon Crime : 'जिथं दशहत केली, तिथंच पोलिसांनी सराईत गुंडाची काढली धिंड', मालेगाव पोलिसांनी दिला निर्भीडतेचा संदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/9ad8f5ac6bcd044f704f03f92c3d07491697021564884738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मालेगाव (Malegaon) शहर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अशातच खून (Murder), प्राणघातक हल्ले, मारहाण, घातक शस्त्रे बाळगणे आदी गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंड रब्बानी कदिर शेख याची पोलिसांनी शहरातील पवारवाडी भागातून धिंड काढली. ज्या भागात त्याने दहशत निर्माण केली होती, तिथेच बेड्या घालून धिंड काढत त्यांच्या गुंडगिरीचे भूत उतरविले. ही गुन्हेगारी दहशत मोडीत काढत जनतेला निर्भीडतेचा संदेश देत गावगुंडांवर पोलिसांचा वचक निर्माण केला.
नाशिकसह (Nashik जिल्ह्याभरात सराईत गुन्हेगारांसह अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारीच्या (Crime) घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र हळूहळू पोलिसांनी याबाबत कडक पाऊले उचलत थेट सराईत गुन्हेगारांना धडा शिकवण्याचे काम सुरु केले आहे. सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचे मनसुबे मालेगाव पोलिसांच्या (Malegaon Police) सतर्कतेमुळे उधळले गेले. मालेगाव परिसरातील लब्बैक हॉटेल परिसरात लुटमारीच्या उद्देशाने आपल्या साथीदारांसह लब्बैक हॉटेल परिसरात आलेल्या रब्बानीला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून दोन जण फरार झाले. संशयितांकडून दोन गावठी बंदुका, सहा जिवंत काडतुसे, एक तलवार जप्त करण्यात आली आहे. रब्बानीवर पवारवाडी व शहर पोलिस ठाण्यांमध्ये पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान मालेगाव शहरातील Malegaon Crime) गुन्हेगारी मोडीत काढण्याचा इशारा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सातत्याने पेट्रोलिंग सुरु आहे. तसेच रात्रीच्या सुमारास काही जण रस्त्याने जाणाऱ्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून भ्रमणध्वनी आणि पैसे लुटत असून ते राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलकडे निघाले असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. पाठलाग करत तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पकड्ण्यात आलेल्यांमध्ये शेख रब्बानी शेख जहीर, जलाल मोहम्मद हनीफ या तिघांचा समावेश आहे. रब्बानी हा सराईत गुन्हेगार असून सर्व संशयितांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच
दरम्यान रब्बानीसोबत पकडलेल्या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. इतर गुन्ह्यांच्या तपासात रब्बानीला संबंधित पोलिस ठाण्याकडून ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. फरार संशयितांमध्ये शाहिद शकील अहमद उर्फ अख्तर काल्या, मोहम्मद रजा याचा समावेश असून संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरात सातत्याने मारहाणीच्या, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र बघून पोलिसांनी यावर धडक मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. तात्पुरती कारवाईने संशयित धजावत नसल्याचे या घटनांवरून दिसून येते. मागील एक महिन्याच्या घटनाक्रम जरी लक्ष घातले तरीही शहरातील गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा अंदाज येत आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)