Nashik Igatpuri Fire: इगतपुरी आग दुर्घटना : उपचारादरम्यान दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Nashik Igatpuri Fire : इगतपुरी स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 14 जखमी असून यातील दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Nashik Igatpuri Fire : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी आता महत्त्वाचा माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत एकूण 14 जखमी असून यातील दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जवळपास गेली तीन तासांपासून या ठिकाणी स्फोट होत असून आतापर्यंत येथून 14 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार जणांची प्रकृती गंभीर असून इतर नऊ जणांवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा निरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी दिली आहे. तर सिल्लोड येथील कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील म्हणाले की सकाळी साडेदहा साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही आग लागली. आग लागल्यानंतर सद्यस्थितीत आठ बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जण या घटनेत जखमी असून चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून उपाययोजना व सूचना देण्याचे काम करत आहेत.
तसेच कंपनीत जिथे घटना घडली तिथे दहा ते पंधरा कर्मचारी काम करत होते. अजून तीन ते चार जण कंपनीत अडकले असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून आठ बंब असून देखील अजूनही आगीवर नियंत्रण मिळू शकले नसल्याचे समोर येत आहे. या घटनेत आतापर्यंत चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे तर 14 जण जखमी आहेत. जखमींना नाशिकमध्ये वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
दोन महिलांचा मृत्यू
दरम्यान नाशिकच्या आयसीओ ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये चार रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही महिला कर्मचारी असून महिमा व अंजली या अशी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर इतर दोघांवर उपचार सुरू असून दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉक्टर सचिन बंगाळे यांनी माहिती दिली आहे.
मंत्री अधिकारी घटनास्थळी..
सद्यस्थितीत घटनास्थळावर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घटनेबद्दल अधिक माहिती दिली. यावेळी गमे म्हणाले की, जखमींना नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
100 बेड्स राखीव...
डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कंपनीतील बॉयलरमचा भीषण स्फोट झाल्याने आग लागली. त्यावेळी आजूबाजूच्या गावांना याचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने 14 जणांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी मेडिकल कॉलेज, वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयांत 100 बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पाहा व्हिडिओ: Nashik Fire नाशिकमध्ये इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग : ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: