Nashik news: नातवाने खेळताना क्लच दाबला, ट्रॅक्टर आजीच्या अंगावरुन गेला, नाशिकमध्ये दिवाळसण काळवंडला
Nashik news: लहान नातू ट्रॅक्टरवर खेळत असताना चुकून क्लच दाबला गेला, आणि ट्रॅक्टर अचानक पुढे सरकत अनुसया जगताप यांच्या अंगावर गेला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.

नाशिक: नाशिकरोड परिसरातील जुने सामनगाव येथे सोमवारी (20 ऑक्टोबर) एक हृदयद्रावक (accident News) घटना घडली. अनुसया दिगंबर जगताप (वय 70) या वृद्ध महिला आपल्या घराच्या अंगणात भुईमुगाच्या शेंगा तोडत होत्या. अंगणात त्यांच्या नातवंडांचा खेळ सुरू होता. दरम्यान, लहान नातू ट्रॅक्टरवर (accident News) खेळत असताना चुकून क्लच दाबला गेला, आणि ट्रॅक्टर अचानक पुढे सरकत अनुसया जगताप यांच्या अंगावर गेला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.(accident News)
जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, पोलिस हवालदार झाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
घटनेनंतर जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन दिवाळीच्या सणात घरात शोककळा पसरली आहे. ज्यावेळी गावात फटाक्यांचा आवाज आणि दिव्यांची रोषणाई होती, त्याच वेळी जगतापांच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली. गावकऱ्यांनी सांगितले की, “अनुसया आजी या अत्यंत प्रेमळ होत्या. त्या रोज शेतकामात मदत करत आणि नातवंडांना संभाळत. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
























