(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायतीत एन्ट्री, नाशिकमध्ये पहिला विजय
Nashik Grampanchayat Election : स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेश गावातून झालाय.
Sambhaji Chhatrapati : राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेय. भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केलाय. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतीचा (Grampanchayat Election) आज निकाल लागणार आहे. नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं विजय मिळवला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. स्वराज्य संघटनेला महाराष्ट्रातून पहिला विजय हा नाशिक मधील गणेश गावातून मिळाला आहे. येथील रूपाली ठमके यांनी सरपंच म्हणून विजय मिळवला आहे. दरम्यान, नाशिक निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते. स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे.
याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी फोनद्वारे रूपाली यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेचे नाशिक तालुक्यातील आणखी दोन सरपंच पदाचे उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यामुळे एकूण तीन सरपंच आणि जवळपास 20 सदस्य निवडणून येणार असल्याचे स्वराज्य संघटनाचे प्रवक्ते डॅा. धनंजय जाधव यांनी सांगितले.