नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवारांचा जोश तर मतदारांची उदासीनता, नेमकं घडणार काय?
ज्या घडामोडी नाशिक मतदारसंघात घडल्या, त्या उभ्या महाराष्ट्राने पहिल्या. मात्र दुसरीकडे मतदारांचं मतच कुणी विचारात घेतले नसल्याचे पदवीधर मतदारांच्या एकूणच प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय.
Nashik graduate constituency elections : एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघात उद्या निवडणूक पार पाडत आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकीचा ज्वर मतदारसंघात पाहायला मिळतो आहे. ज्या घडामोडी नाशिक मतदारसंघात घडल्या, त्या उभ्या महाराष्ट्राने पहिल्या. मात्र दुसरीकडे मतदारांचं मतच कुणी विचारात घेतले नसल्याचे पदवीधर मतदारांच्या एकूणच प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय.
नाशिक पदवीधर निवडणुकीत आजही ट्विस्ट आहे, कालही होत आणि उद्याही राहणार आहे. पहिल्या दिवसांपासून सुरू झालेला ट्विस्टचा खेळ अद्यापही सुरू आहे. सत्यजीत तांबे यांची उमेदवारी, शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा तर दुसरीकडे नशीब आजमावत स्वराज्य संघटनेने केलेली एन्ट्री हे सगळं नाशिक पदवीधरच्या मतदारांना नवीन होत. मात्र दोन्ही प्रबळ उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मात्र उमेदवारांचे समर्थक सोडता इतर पदवीधर मतदार निवडणुकीबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे प्राबल्य
नाशिक पदवीधर निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. अवघ्या काही तासांवर निवडणूक मतदान येऊन ठेपले आहे. या निवडणुकीसाठी जवळपास नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. मात्र यातील अनेक उमेदवारांची नावेच मतदार यादीत नसल्याचे चित्र आहे. अनेक पदवीधरांनी नाव नोंदणी केली नसल्याने ते पदवीधर मतदार प्रक्रियेतून बाहेर पडल्याचे दिसून आले. शिवाय अनेकांनी नाव न आल्याने बरेच झाले, अशाही प्रतिक्रीया दिल्या. त्यामुळे एका बाजूला उमेदवार जोशात असले तरी मात्र मतदार निवडणुकीबाबत उदासीन आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे प्राबल्य असून मागील दहा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे मतदारराजा निवडणुकीबाबत उदासीन असल्याने नेमकी मतदान किती होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवघे काही तास शिल्लक, उमेदवारांचा निवडणुकीत कस लागणार
नाशिक पदवीधरच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास शिल्लक असून उमेदवारांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियासह मतदारांशी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे दुसरीकडे मतदारांची उदासीनता आणि उमेदवारांचा असलेला जोश नेमकी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काय रंग उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ही बातमी देखील वाचा