Nashik : नाशकात भाजपला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे दोन उमेदवारांचे अर्ज बाद; सुधाकर बडगुजरांच्या घरातील तीन अर्ज वैध
Nashik BJP News : भाजपचे एबी फॉर्म वाटताना गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नंतर पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्म वाटण्यात आले होते.

नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी समोर आल्यानंतर त्याचा फटका आता उमेदवारांनाही बसल्याचं दिसून आलं. सिडको भागातील भाजपच्या दोन उमेदवारांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने तो मोठा धक्का मानला जातोय. माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. तर त्याचवेळी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar), त्यांच्या पत्नी आणि मुलाचा अर्ज पात्र ठरला आहे.
नाशिक भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे दोन उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा आहे. या उमेदवारांना एबी फॉर्म देताना गोंधळ झाला होता. अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे आणि भाग्यश्री डोमसे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांचा अर्ज वैध
दुसरीकडे, ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज मात्र वैध ठरला. सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, पुत्र दीपक बडगुजर हे प्रभाग 25 मधून निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. त्याचवेळी दीपक बडगुजर यांचा प्रभाग 29 मधूनही उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर दीपक बडगुजर हे भाजपकडून दोन प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
Mukesh Shahane Nashik : मुकेश शहाणे भावुक
मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर ते भावुक झाल्याचं दिसून आलं. मुकेश शहाणे यांना अश्रू अनावर झाले. त्याचवेळी त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केल्यानंतर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
अर्ज बाद झाल्यानंतरही मुकेश शहाणे प्रभाग 29मधून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यासमोर मुकेश शहाणे अपक्ष म्हणून लढणार आहेत.
Nashik Election News : पक्षाचा निर्णय मान्य, बडगुजरांची प्रतिक्रिया
प्रभाग 29 मधील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "या उमेदवारांचा रोष माझ्यावर जरी असला तरी, निर्णय पक्षाने घेतला होता. पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल. कायदेशीर प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरला. मुकेश शहाणे हा देखील आमचाच आहे, त्यामुळे पक्षासोबत चर्चा करून निर्णय होईल. या प्रकरणात पक्षाने निर्णय घेतले होते. एबी फॉर्म संदर्भात काय गोंधळ झाला याची मला कल्पना नाही."
Nashik BJP News : भाजपमध्ये अंतर्गत गोंधळ
नाशिकमधील भारतीय जनता पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकिट दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पक्षाचे एबी फॉर्म देताना इच्छुकांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांचा हा गोंधळ पाहता शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं आणि पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलं. त्यावेळी काही इच्छुकांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचाही पाठलाग केल्याची घटना घडली. नाशिकमधील भाजपचा तिकीट वाटपाचा मोठा घोळ समोर आला. तिकीट वाटपाच्या या थरारामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.
ही बातमी वाचा:























