Nashik Crime : सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा
Nashik Crime News : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (Satpur ITI) तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB) प्राचार्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना लवकरच अटक होण्याचीही शक्यता आहे. वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करुन ते खरेदी न करता, केवळ बिले सादर करुन ती वटवून संशयिताने भ्रष्टाचार (Corruption) केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष मारुती कदम (Subhash Maruti Kadam) हे तत्कालिन प्रभारी प्राचार्य 2017 ते 2018 या कालावधीत सातपूर आयटीआय येथे कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आयटीआयमार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी अपहार केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.
बनावट बिले सादर करुन 19 लाखांचा अपहार
या अर्जाची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांनी पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाने तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जेम (जेईएम) पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेट-वे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधान आणि गोकुळ पूरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आले. तसेच बनावट बिले तयार करुन ती मंजूर केल्याचे आढळून आले. त्यानुसार, पुरावे मिळाल्यावर उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तब्बल 19 लाखांचा हा घोटाळा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांना कुठल्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.
सिडकोत घरफोडी, पाच लाखांचा ऐवज लंपास
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडको परिसरात घडली. याबाबत श्रीराम किसन काळदाते (रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, शिवनेरी कॉलनी, अंबड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या