Nashik Crime : नाशिकच्या बोधले नगरमध्ये भर रस्त्यात तरुणाला संपवलं, सिनेस्टाईल दुचाकीचा पाठलाग करुन हल्ला!
Nashik Crime News : एका तरुणाचा दुचाकीवर सिनेस्टाईल पाठलाग करुन अंगावर चॉपरने सपासप वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या बोधले नगरमध्ये रात्री उशिरा घडली आहे.
Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारीचा आलेख चढताच असून दिवसाआड खुनाच्या घटनांनी नाशिक (Nashik) हादरत आहे. अशातच एका तरुणाचा दुचाकीवर सिनेस्टाईल पाठलाग करुन अंगावर चॉपरने सपासप वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे.
नाशिक- पुणे मार्गावरील उपनगरच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. तुषार देवराम चौरे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतल्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग बोधले नगरच्या रस्त्यावर घडला. यात दुचाकीवरुन तीन संशयितांनी तुषारच्या दुचाकीचा पाठलाग केला. जवळपास एक ते दोन किलोमीटरचा पाठलाग करुन हल्ला चढवत तुषारला रक्तबंबाळ केले. काही मिनिटांत तुषारचा जागीच मृत्यू झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगर परिसर या घटनेने थरारला. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तुषार चौरे हा तरुण बोधले नगर येथील एका दुकानात कामाला आहे. तो आणि त्याचा मित्र नाशिक-पुणे महामार्गावर बोधले नगर परिसरात दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या तीन संशयितांनी चौरेच्या दुचाकीला लाथ मारली. दुचाकीहून पडल्याने संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला केला, यात चौरे गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील चौरेचा मित्र पळून गेल्याने वाचला. रात्रीची वेळ असल्याने संशयितांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, हल्लेखोर चौरेच्या ओळखीतले असल्याचे आणि पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भर रस्त्यातच खुनाचा थरार
दरम्यान भर रस्त्यातच हा थरार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मित्र आणि नातेवाईकांनी गर्दी केल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा
Nashik crime : मालेगावमध्ये नऊ वर्षीय मुलाचा नरबळी? पाच दिवसांपासून बेपत्ता होता, असा झाला उलगडा?