Nashik Crime : वर्गणी न दिल्याने एकावर गोळीबार, तीन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या सराईताला बेड्या
Nashik Crime News : जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एकावर गोळीबार करून तीन महिन्यांपासून फरारी असलेल्या संशयित आरोपीस गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
नाशिक : चाडेगाव शिवारातील (Chadegaon Shivar) एका हॉटेलमध्ये नेऊन ज्ञानेश्वर मानकर (Dnyaneshwar Mankar) यांच्याकडे सचिन मानकर (Sachin Mankar) याने गावच्या यात्रेतील वर्गणीचे वीस हजार रुपये मागितले. ज्ञानेश्वरने पैसे देण्यास नकार देताच त्याला सचिनसह त्याच्या साथीदारांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार (Firing) केला होता. या प्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन मानकरला पोलिसांनी (Police) अखेर जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामदैवत काशाई देवी यात्रेनिमित्ताने संशयित सचिन मानकर याने गावातील मारुती मंदिरात बैठक बोलाविली. या बैठकीला अनेक ग्रामस्थ अनुपस्थित होते. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर संशयित सचिन मानकर याने ज्ञानेश्वरला बळजबरीने त्याच्या फॉर्च्यूनर कारमधून संशयितांसह चाडेगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये नेले.
20 हजारांची वर्गणी देण्यास नकार दिल्याने मारहाण
तेथे जेवण झाल्यानंतर संशयिताने ज्ञानेश्वरकडे गेल्या यात्रोत्सवातील शिल्लक वर्गणीतील 20 हजारांची मागणी केली. ज्ञानेश्वरने नकार दिल्याने संशयित सचिन याने त्यास मारहाण केली आणि त्याच्या कमरेचे पिस्तुल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. ते पाहून ज्ञानेश्वर पळू लागला असता, अन्य संशयितांनी त्यास पकडले.
तीन गोळ्या झाडल्या
संशयित सचिन याने त्याच्याकडील पिस्तुलीतून झाडलेल्या दोन गोळ्या चुकविल्या तर तिसरी गोळी ज्ञानेश्वरच्या पाठीत घुसली. तशा अवस्थेत तो पळत जाऊन गोकूळ नागरे याच्या घरी गेला आणि आपबिती सांगितली. त्यास रुग्णालयात नेण्यासाठी दोघे निघाले असता, संशयित नागरेच्या घरासमोर पोहोचले. संशयितांनी त्यास बळजबरीने स्वतःच्या गाडीत बसविले आणि गंगापूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संशयित पसार झाले. या प्रकरणी सचिन मानकर, नाना हुळहुळे, महेंद्र मानकर, गोकुळ मानकर, सूरज वाघ, आकाश पवार, अमोल नागरे, सतिश सांगळे, नंदू नागरे यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित अखेर गजाआड
सचिन मानकरच्या साथीदारांच्या काही दिवसातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सचिन मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्यास पाथर्डीगाव परिसरातून अटक करण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी गाव परिसरातील हॉटेल वालदेवी येथे सापळा लावण्यात आला. त्यात सचिन अडकला आणि त्याला जेरबंद करण्यात आले.
आणखी वाचा