हिरे कुटुंबियांविरोधात अडचणीची मालिका सुरूच, अद्वय हिरेंनंतर मोठे बंधू अपूर्व यांच्यावरही गुन्हा दाखल
हिरे कुटुंबीयांविरोधातील गुन्ह्यांची मालिका सुरूच असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरतोय. या सर्व कारवाईमागे शिवसेना नेते दादा भुसे असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येतो आहे.
नाशिक : रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन अर्ज फेटाळला. नाशिकच्या (Nashik News) अद्वय हिरेंनंतरमोठे बंधू अपूर्व हिरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी 56 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि अदिवासी सेवा समिती या संस्थेच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा एकीकडे मालेगाव न्यायालयाने जामीन फेटाळल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढलेला आहे. दुसरीकडे नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात अद्वय यांच्यासह त्यांचे मोठे बंधू आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर हिरे कुटुंबीयांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शिक्षण संस्थेला मिळत असलेल्या नीती आयोगाच्या निधीत अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय
शहर आणि जिल्ह्यात असलेल्या एकूण दहा शिक्षण संस्थांना एक कोटी 56 लाख रुपये निधी मिळाला होता. दरम्यान मार्च 2019 पासून ते आजवर या अनुदानाचा गैरवापर करून सरकारी रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप हिरे बंधूंवर करण्यात आला आहे. एकंदरीतच हिरे कुटुंबीयांविरोधातील गुन्ह्यांची मालिका सुरूच असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरतोय. या सर्व कारवाईमागे शिवसेना नेते दादा भुसे असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येतो आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आज 32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही.तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता इतरत्र वापरले. म्हणून त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच त्यांचा जामीन नाकारल्याने ठाकरे गटाचा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.
हे ही वाचा: