Nashik Bribe : पाच हजारांपासून 40 लाखांची लाच... गेल्या सहा महिन्यात सापडलेल्या नाशिकमधल्या लाचखोर अधिकाऱ्यांची ही यादी
Nashik Bribe : एका कंपनीवर कारवाई न करण्यासाठी 40 लाखांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरुन नाशिकमधल्या प्रांताधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
नाशिक : लाचखोरीत नाशिक सध्या महाराष्ट्रात अव्वल आलेलं असतांनाही लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. रोज कुणी ना कुणी लाच घेताना सापडत आहेत, त्यांच्यावर कारवाईही होत आहे. पण तरीही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हेच यातून दिसून येतय.
नाशिक हे सध्या लाचखोरांचं माहेरघर बनलेलं असतांनाच तब्बल 50 लाखांच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती 40 लाख रुपये स्विकारण्याची तयारी दाखवल्याने दिंडोरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार यांना एसीबीने ताब्यात घेत त्यांच्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांची दिंडोरी तालुक्यात कंपनी असून कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषक (NA) परवानगी न घेतल्याने त्यांचे कंपनीस अपार यांनी नोटीस बजावली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेताच एसीबीकडून दिंडोरीत अपार यांच्या कार्यालयाबाहेर बुधवारी सापळा रचण्यात आला होता. दरम्यान तक्रारदार आणि अपार यांची भेट होताच अपार यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि चतुराईने त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. त्यामुळे एसीबीचा ट्रॅप फसला होता.
चालू वर्षी नाशिक परिक्षेत्रातील एसीबीच्या मोठ्या कारवाया
1. महेश कुमार शिंदे - नाशिक जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख - 50 हजारांची लाच घेतली होती - सध्या निलंबित आहेत.
2. महेश पाटील - कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार - साडेतीन लाख लाच घेतली होती - सध्या निलंबित आहेत.
3. अमर खोंडे - व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महावितरण, धुळे - दोन लाखांची लाच घेतली होती - सध्या निलंबित आहेत.
4. संजय केदार - मुख्याधिकारी, सिन्नर नगरपरिषद - पाच हजारांची लाच घेतली होती - अजून निलंबित नाहीत.
5. सतीश खरे - नाशिक जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग - 30 लाखांची लाच घेतली होती - सध्या निलंबित आहेत.
6. विजय बोरुडे - तहसीलदार, कोपरगाव, अहमदनगर - 20 हजारांची लाच घेतली होती - अजून निलंबित नाहीत.
7. सुनीता धनगर - शिक्षणाधिकारी, नाशिक महापालिका - 50 हजारांची लाच घेतली होती - सध्या निलंबित आहेत.
लाचखोरांची तक्रार द्या. एसीबीचे आवाहन
एसीबी नाशिकच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांनी नागरिकांनी लाचखोर अधिकाऱ्यांची तक्रार देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, लाच देणं आणि घेणं गुन्हा आहे. नागरिकांनी न घाबरता पुढे यावं तक्रार देण्यासाठी आम्ही तुम्हला सरंक्षण पण देतो. तसेच पुढे कायदेशीर कामही तुमचे अडकणार नाही याची खात्री देतो. 1064 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे जो 24 तास सुरु असतो, मोबाईल रिचार्ज संपला असेल तरी तो लागतो.
चालू वर्षी एकट्या नाशिक परिक्षेत्राचाच विचार केला तर एकूण 92 गुन्ह्यात 134 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दर दोन तीन दिवसाआड एसीबीच्या जाळ्यात कोणी ना कोणी अडकत असूनही लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हेच यातून बघायला मिळतय.
ही बातमी वाचा: