(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion : नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा; मात्र बाजार समितीत नाफेडकडून खरेदी सुरु नाहीच
नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे.
Onion Price News : राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी संकटात असतानाच, काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. दरम्यान, कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कोणत्याही बाजार समितीत नाफेडने (Nafed) कांदा खरेदी सुरु केल्याचे दिसत नाही.
नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात दिली होती. मात्र, अद्यापही बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली नाही. राज्यात अवकाळी पावसामुळं बळीराजा अक्षरश:मेटाकुटीला आला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. अशातच राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांन 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं आहे. त्याचा हातभार मात्र शेतकऱ्याला लागू शकतो. शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनाला नाफेडकडून जास्तीचा भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, सध्या बाजार समितीत नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झाली नाही.
विधीमंडळात नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला होता. कारण एकीकडे मेथी, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दर (onion Price) पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती. ही माहिती फडणवीसांनी 2 मार्च 2023 ला दिली होती. प्रत्यक्षात मात्र, बाजार समित्यांना याबाबत काहीही कळवलेलं नाही. अद्याप बाजार समितीत्यांमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली नसल्याने समिती आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, बाजार समितीत नाफेडकडून खरेदी सुरु न झाल्यानं शेतकरी प्रश्न विचारत आहेत. सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं नाफेडकडून खरेदी करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून नाफेड कांद्याची खरेदी करत आहे. मात्र बाजार समितीत अद्याप खरेदी सुरु झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : फडणवीसांचं आश्वासन, तरीही नाफेडकडून बाजार समितीत कांदा खरेदी नाही; बळीराजा मेटाकुटीला