Dindori Lok Sabha : मविआ उमेदवाराच्या बैठकीत अजित पवार गटाच्या आमदाराची हजेरी, महायुतीत खळबळ
Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी तालुक्यातील तिसगावमध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने हजेरी लावल्याने महायुतीत खळबळ उडाली.
Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) भाजपने डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. भास्कर भगरेंचा दिंडोरीत जोरदार प्रचारदेखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या बैठकीला नेमके का उपस्थित राहिले? याबाबत अजून स्पष्टता नसली तरी हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे.
भास्कर भगरेंच्या मांडीला मांडी लावून बसले नरहरी झिरवाळ
दिंडोरी तालुक्यातील तिसगावमध्ये आज सकाळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या मांडीला मांडी लावून नरहरी झिरवाळ त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने झिरवाळ नाराजी असल्याची चर्चा आता रंगली आहे. तसेच नरहरी झिरवाळ हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट निवडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भगरे आणि झिरवाळ यांची चांगली ओळख - छगन भुजबळ
दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मला काही माहिती नाही. असे काही मला वाटत नाही. भगरे आणि ते दिंडोरीतील आहे. भगरे आणि झिरवाळ यांची चांगली ओळख आहे. जिल्हा परिषदेत भगरे आमच्या सोबत होते. यात वेगळा अर्थ काढण्याचे काही कारण नाही. माझ्याकडे काही लोक येतात. प्रत्येक ठिकाणी जाणे हे उमेदवाराचे काम आहे. शांतीगिरी महाराजदेखील मला भेटून गेले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या