Dindori Lok Sabha : अखेर दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार, शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंना पाठींबा जाहीर
Dindori Lok Sabha Election 2024 : माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेतून माघार घेतली आहे. तसेच शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र माकपला दिंडोरीची जागा सोडावी, अन्यथा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पडणारच असा इशारा देत माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. आता जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेतून माघार घेतली आहे. तसेच शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना पाठींबा जाहीर केला आहे.
जे पी गावित यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, माकपतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र दिंडोरीची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा एकाच उमेदवार पाहिजे, अशी विनंती राष्ट्रवादी कडून करण्यात आली.
दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार
तसेच माकप पक्षाने देखील आम्हाला सुचना केल्याने मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेत आहे. खर तर आमच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटालाच फायदा झाला असता मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत दिंडोरीत होईल. त्यामुळे या लढतीचा परिणाम काय होईल, याबाबत सांगता येणार नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे, यांना पाठींबा देत आहोत, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या