Raj Thackeray : गुरुवारपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; म्हणाले, "तयारीला लागा मी येतोय"
Nashik News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे. तयारीला लागा मी येतोय, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटले आहे.
Raj Thackeray नाशिक : गेल्या महिन्याभरापासून नाशिकचे राजकीय महत्व वाढल्याचे दिसून येत आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकला हजेरी लावली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी नाशिकला हजेरी लावली. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे. लोकसभेत मतांची विभागणी करण्यासाठी राज ठाकरे रणनीती आखणार आहेत. 2008 साली नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. तर 2012 साली नाशिक महापालिकेत मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र मनसेला नाशिकचा गड राखता आला नाही.
तयारीला लागा मी येतोय - राज ठाकरे
नाशिकमध्ये लोकसभेची (Lok Sabha Elections 2024) तयारी सुरू झाली असताना एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे चार दिवस तळ ठोकणार आहे. 1 ते 4 फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकांची रणनीती आखणार
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरचिटणीस किशोर पाटील यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा राज ठाकरेंकडे सादर केला आहे. नाशिकमध्ये लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार उभा केला जाणार असून नाशिकमधून दिलीप दातीर यांच्या यांच्या नावाची चर्चा आहे.
मार्चमध्ये राहुल गांधीही नाशकात
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो यात्रा' मणिपूरमधून सुरू झाली आहे. मार्चच्या प्रारंभी ही यात्रा नाशिकला पोहोचणार आहे. या यात्रेचा समारोप मुंबईला होईल. याबाबत सध्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. यात्रेचा शेवटचा टप्पा मुंबई असून, नाशिकमधून ही यात्रा मार्गक्रमण होणार आहे. राहुल गांधी यांच्या स्वागताची नाशिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे.
आणखी वाचा