Eid-Ul-Fitr 2023 : रमजान पर्वाचा उत्तरार्ध, रात्रीचा झाला दिवस; मालेगावात खरेदीसाठी महिलांमध्ये मोठा उत्साह
Malegaon News : रमजान महिन्याच्या उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या मालेगावात मुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे.
Malegaon News : रमजान महिन्याच्या (Ramadan 2023) उत्तरार्धात खरेदीसाठी नाशिकच्या (Nashik) मालेगावात (Malegaon) मुस्लीम महिलांची शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. रात्रभर खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत असल्याने शहरातील किदवाई रोड, गूळबाजार, मुशावर्त चौक, अंजुमन चौक आदी ठिकाणी 'रात्रीचा दिवस' झालेला पाहायला मिळतो. येत्या शुक्रवारी (21 एप्रिल) रात्री चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी (22 एप्रिल) रमजान ईद (Eid-Ul-Fitr 2023) असणार आहे. त्यामुळे रमजान ईदच्या खरेदीसाठी महिलावर्ग गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण रात्र महिलांसह आबालवृद्धांची खरेदीसाठी झुंबड
महिला विशेष करुन चपला, कपडे, बांगड्या, ज्वेलरी, नान पाव, कटोरे, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करत आहेत, तर पुरुष वर्ग टोप्या, लुंगी, सुवासिक अत्तर, तयार कपडे आदींना पसंती देत आहे. खरेदीसाठी मोजकेच दिवस राहिल्याने संध्याकाळ होताच दिवसभर रोजा असलेल्या रोजाधारकांकडून इफ्तारीसाठी फळे आणि खजूर यांची खरेदी केली जाते. त्यानंतर संपूर्ण रात्र महिलांसह आबालवृद्धांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
सर्वच रस्त्यांवर विद्युत रोषणाई
शहरात रमजान ईदमुळे रौनक आली असून रात्री विद्युत रोषणाईने सर्वच रस्ते न्हाऊन निघाले आहे. दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे. मालेगाव स्थानिकांखेरीज ग्रामीण भागातून विशेषतः नांदगाव, देवळा, सटाणा, नामपूर, मनमाड, झोडगे आदी भागातून मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने खरेदीसाठी मालेगावी येत आहेत. काही जण चांदरातच्या दिवशी खरेदीसाठी गर्दी करतात. उपवास सोडण्यासाठी लागणारे खजूर आणि फळांची मोठ्या प्रमाणात शहरात आवक झाली असून त्याची सर्वाधिक विक्री मालेगावात होत आहे.
रमजान काळात एकदा तरी मालेगावात या!
रमजान ईद म्हटले की मालेगावात खरेदीसाठी झुंबड उडते. केवळ मालेगावकर नाहीच तर परिसरातील नांदगाव, मनमाड, सटाणा, आदी तालुक्यातील मुस्लीम बांधवही येथे खरेदीसाठी गर्दी करतात. योग्य भाव व उत्तम दर्जा असलेल्या वस्तू खरेदी करायला रमजान काळात एकदा तरी मालेगावात यायलाच हवं.
रमजान महिन्याचं महत्त्व
इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम (Islamic Months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फित्र असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.