Nashik Tomato : टोमॅटोची लाली उतरली, नाशिकमध्ये 20 किलोच्या कॅरेट्सला 1200 रुपयांचा दर, तर शंभरचे एक किलो
Nashik News : नाशिकच्या (Nashik Bajar Samiti) सर्वच बाजार समित्यांमध्ये जवळपास पन्नास टक्के दाराची घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो (Tomato Rate) भलताच फॉर्मात आहे, यामुळे कधी नव्हते शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते. मात्र अशातच केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. नाशिकच्या (Nashik Bajar Samiti) सर्वच बाजार समित्यांमध्ये जवळपास पन्नास टक्के दाराची घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी हेच 20 किलोचे कॅरेट्स 2200 रुपयांहून अधिक दरात जात असताना आता थेट अकराशे ते बाराशे रुपयांवर भाव आलेला आहे.
केंद्र सरकारने आयातीचे धोरण स्वीकारल्याने व बंगळुरूच्या बाजारपेठेत वाढलेल्या आवकेमुळे टोमॅटोच्या (Tomato Rate Down) दरात घसरगुंडी झाली. दोन हजार रुपयांचा दर एकाच दिवसात निम्म्यावर येत तो 1100 ते 1200 रुपये प्रति क्रेट्सपर्यंत कोसळला. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 1200 रुपये भाव मिळत आहे, तर किलोला शंभर रुपये मोजावे लागत आहे. एकीकडे टोमॅटोला भाव असताना ग्राहकांची परवड झाली; पण शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळत होते. अशातच भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळमधून (Nepal) टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
गेल्या महिनाभरापासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्रेट्स असा स्वप्नवत भाव मिळत होता. टोमॅटोचे दर सर्वकालीन उंचीवर पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानांचे वातावरण होते. याउलट चित्र ग्राहकांमध्ये होते. परराज्यात किरकोळ बाजारात ग्राहकांना 200 ते 250 रुपये किलो खरेदी करावा लागत होता. मात्र दरवाढीवरून ग्राहकांची ओरड होऊन लागल्याने टोमॅटोची नेपाळमधून आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारकडून जाहीर होतात, त्याचे पडसाद बाजारभावावर उमटल्याचे दिसून आले आहे.
नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये भाव घसरले...
नाशिक जिल्ह्यातील मनमाडसह लासलगाव (Lasalgaon), पिंपळगाव बाजार समितीत गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 2200 ते 2400 रुपये इतका दर मिळत असल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर किलोला 200 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे ग्राहकांना टोमॅटो महाग घ्यावा लागत होता ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने नेपाळ येथून टोमॅटो आयात सुरू केल्यामुळे तसेच पंजाब, कर्नाटक राज्यांतून जिल्ह्यात आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घरसरण सुरू झाली असून, चार दिवसांत टोमॅटो चे दर 50 टक्क्यांहून अधिक दर खाली आले आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चार दिवसांपूर्वी 20 किलोच्या प्लेट्सला 2200 ते 2400 रुपये भाव मिळत होते. तर आजच्या बाजारभावानुसार 50 टक्के होऊन जादा घसरत 20 किलोच्या क्रेटसला जास्तीत जास्त 1100 ते 1200 रुपये कमीत कमी दोनशे रुपये तर सरासरी 900 रुपये भाव मिळत आहे.