Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सात लाखाहून अधिक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी
Nashik News : भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षपूर्ती निमित्त हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या उपक्रमाअंतर्गत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहेत.
Nashik News : भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षपूर्ती निमित्त हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या उपक्रमाअंतर्गत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहेत. यासाठीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यान्वयन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक डॉ. प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संजय नेरकर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदी बाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देऊन तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरण यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
साडे सात लाख घरांवर तिरंगा
ग्रामीण भागात तिरंगा प्रकल्प संकल्प हर घर तिरंगा उपक्रमासाठी ग्रामीण भागात 7.50 लाख घरांवर तिरंगा फडकवण्याचे संकल्प असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले. यासाठी शाळा महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर हरगड तिरंगा उपक्रमाबाबत चर्चासत्र स्पर्धा शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मांडली.