(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NMC Election : नाशिक मनपा मतदानासाठी देणार दीड मिनिटांचा वेळ; दोनशे मतदान केंद्र वाढणार
Nashik NMC Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून नाशिक मनपा प्रशासन जोरदार तयारी करत आहे.
Nashik NMC Election : नाशिक मनपा (Nashik NMC Election) निवडणुकांचा बिगुल वाजला असून त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच मनपा प्रशासनही सज्ज झाले असून मतदान केंद्रांची(Polling Booth) संख्या वाढल्याने झोनल अधिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे. यासाठी प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून काही काही ना कारणामुळे रखडलेली निवडणूक लवकरच पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक मनपाने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली. येत्या काही दिवसांत प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. हे सर्व करत असतांना आता मनपाने नाशिक शहरातील मतदारांची यादी बनविण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर मतदार यादीची जुळवाजुळव देखील महापालिकेच्यावतीने सुरू आहे.
दरम्यान 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे पंधरा लाख 84 हजार लोकसंख्या गृहीत धरून महापालिका निवडणुकीचे नियोजन करीत आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत शहरात सुमारे चौदाशे मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मात्र यंदा मतदार संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. परिणामी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने महापालिका प्रशासन नियोजन करत आहे. यंदाच्या निवडणुकीचा आवाका बघता मतदान तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 10 हजार मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे मनपाने सांगितले आहे. त्या दृष्टीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. मतदार संख्या वाढणार असल्याने शहरात यंदा 200 मतदान केंद्रे असून एकूण 212 झोनल अधिकाऱ्यांची गरज लागणार आहे.
नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार हे सातत्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निवडणूक नियोजनाचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीसाठी लागणाऱ्या सुमारे दहा हजार अधिकारी व सेवकांसाठी शहर तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी तसेच शासकीय, शाळा, महाविद्यालय आदी सुमारे चारशे संस्थांना पत्र पाठवले होते. या खाजगी संस्थांकडून अधिकचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. काहींच्या याद्या वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात घेऊन कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर सर्व संस्थांनी यादी महापालिकेला दिली आहे.
दोनशे केंद्रे वाढणार
दरम्यान महापालिका प्रशासन सुमारे सोळाशे मतदान केंद्र तयार करणार असून त्यासाठी विविध प्रकारचे 212 झोन (विभाग) तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक झोनवर एक अधिकारी राहणार असून त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एका मतदान बूथ केंद्रावर एकूण पाच कर्मचारी कार्यरत असणार आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील एकूण 44 प्रभागांसाठीची मतदार यादी जोडण्याचे काम सुरू झाले आहे.
दीड मिनिटात मतदान
सध्या नाशिक महापालिका आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे मतदार याद्या, मतदान केंद्रे, अधिकाऱ्यांची पथके आदी गोष्टीवर भर देत आहे. असे असतानां मतदार याद्या तयार करतांना मतदारांना मतदानासाठी किती वेळ देण्यात येईल यावर ही चर्चा होत आहे. मतदार याद्या नुसार सध्यातरी नाशिककर मतदारांना एक मतदान करण्यासाठी साधारण दीड मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.