(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Satyjeet Tambe : सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाची शक्यता, शिस्तपालन समितीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस
Nashik Satyajit Tambe : सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Nashik Satyajeet Tambe : नाशिक (Nashik Graduate Constituency Election) पदवीधर निवडणुकीत क्षणाक्षणाला नवी घडामोड घडत आहे. पक्षाचा आदेश मोडल्यामुळे सुरुवातीला सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe)यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर यावर योग्य वेळी भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे (Sudhir tambe) यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच पाल चुकचुकली. यानंतर राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये काँग्रेसची नाचक्की झाली. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर हायकमांडकडे कारवाईची मागणी केली. दोनच दिवसात सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. आता सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
दरम्यान सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्यासाठी शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे समजते आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे यानी माघार घेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी पसरली आहे. या नाराजीचे सूर थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याने डाॅ. सुधीर तांबे यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती आहे. सत्यजीत तांबे यांचे निलंबन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिस्तपालन समितीने दिली आहे.
तांबे भाजपच्या वाटेवर?
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर आपल्याला सर्वच पक्षाचा पाठिंबा आवश्यक असणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असून भाजपचा देखील पाठिंबा घ्यावा लागणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानुसार सत्यजीत तांबे हे कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत अशाप्रकारचा सूर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात दिसून येत होता. त्यामुळे पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असून काही मिनिटे शिल्लक आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यावर नेमकी काय भूमिका घेतय हे लवकरच स्पष्ट होणार आहेत. त्याचबरोबर अर्ज माघारीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि तोपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काय नेमकी कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सत्यजित तांबे म्हणाले...
दरम्यान याबाबत सत्यजीत तांबे यांच्याशी संवाद साधण्यात आला. "जो निर्णय व्हायचाय तो होऊ द्या, तो झाल्यावर बघू, त्याचबरोबर माझी भूमिका नंतर स्पष्ट करेन, अशी प्रतिक्रिया माहिती सत्यजीत तांबे यांनी एबीपी माझा दिली आहे.
VIDEO : Satyajeet Tambe Suspension : सत्यजीत तांबे यांचं निलंबन? काँग्रेस शिस्तपालन समितीची शिफारस Nashik