Nashik News : नाशिक जिल्हा 'आभाळमायेच्या' प्रतीक्षेत, जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
Nashik News : नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ 26 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nashik News : राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरु असताना मात्र नाशिक (Nashik District) जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक शहराला (Nashik City) पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ 26 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात समाधान कारक पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै महिना उजाडून काही दिवस झाले असताना अद्यापही नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. यामध्ये देवळा, चांदवड, मनमाड, सिन्नर, नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर आदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून रिमझिम पाऊस आहे. जिल्ह्यातील धरणांत केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
दरम्यान नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह मुकणे धरणात महापालिकेच्या आरक्षित साठा आगामी काही दिवस पुरेल एवढा शिल्लक आहे. दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत गंगापूर धरणात सध्या तीन टक्के पाणीसाठा कमी असून पुढच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास महापालिका प्रशासन आढावा घेऊन शहराच्या पाणी कपातीवर निर्णय घेणार आहे. शिवाय जिल्ह्यातील धरणांमध्ये जुलै अखेर पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिककरांवर पाणी कपातीची शक्यता
नाशिक महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणासह मुकणे धरणात पाणी आरक्षित करण्यात येते. दरम्यान नाशिक महापालिकेच्या आरक्षित साठ्यापैकी मुकणे धरणात 200 दशलक्ष घनफूट पाणी आहे, त्याचप्रमाणे गंगापूर धरणात 415 दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी आरक्षित आहे. मागील वर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा 36 टक्के इतका होता, मात्र यंदा हाच पाणीसाठा 26 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट येणार आहे.
नाशिक मनपा अधिकारी शिवाजी चव्हाणके म्हणाले कि, शहरात आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. मात्र आगामी काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. तसे पाऊस न झाल्यास पुढच्या आठवड्यात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आढावा घेणे देईल व शहराच्या पाणी कपाती बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.