Nashik Ganeshotsav : दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा, मग विसर्जनानंतर मुर्त्यांची अशी अवस्था का होते?
Nashik Ganeshotsav : दहा दिवस गणरायाला (Ganpati Bappa) घरात, ज्या आदराने वागवतो, तोच आदर विसर्जन (Ganesh Immersion) झाल्यानंतर मुर्तीला का मिळत नाही?
Nashik Ganeshotsav : दहा दिवस गणरायाला (Ganpati Bappa) घरात, ज्या आदराने वागवतो, तोच आदर विसर्जन झाल्यानंतर मुर्तीला का मिळत नाही? कालच्या विसर्जनानंतर आज गोदाघाटावर पाण्यातून शेकडो गणेशमुर्ती काढण्यात आल्या. नदीचे प्रदूषण होत असताना तरीदेखील अनेक नाशिककरांनी गणेश मूर्ती नदीत विसर्जित केली. ज्या बाप्पाला दहा दिवस मनोभावे पूजा केली, पुढे जाऊन मूर्तीची अवस्था वाईट होणार हे माहिती असूनही अट्टहास का? असा सवाल नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांनी केला आहे.
नाशिकमध्ये (Nashik) यंदा मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले. त्याच बरोबर गणपती बाप्पांसोबतचे दहा दिवस भुरकन उडूनही गेले. या दहा दिवसांत घरोघरी आगमन झालेल्या गणपती बाप्पाचा चांगला पाहुणचार करण्यात आला. गणपती बाप्पाला लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण आदराने स्नेहपूर्वक भाव व्यक्त करीत होते. तर विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. एवढा आदर भाविक बाप्पाला दहा देत असतात, तोच आदर मात्र विसर्जनावेळी दिसत नाही, प्रशासनाकडून वारंवार याबाबत सूचना देऊन महापालिकेच्या मुर्ती-दान मोहिमेला दुर्लक्षित करुन नदीत विसर्जन केल्याचे आढळून आले.
नाशिकचे स्वछ्ताग्रही असलेले चंद्रकिशोर पाटील यांनी आज सकाळी गोदाकाठावर परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत रोष व्यक्त केला. ते म्हणाले लहान मुलांचा लाडका बाप्पा त्यांनी आज पाहिला तर त्यांना किती दुःख होईल? त्यांच्या बाप्पाची हात मोडलेली, सोंड फुटलेली अशी मुर्ती पाहून चिमुकल्यांना काय वाटेल? या सगळ्यांचा नागरिकांनी विचार करायला हवा आणि आचरण बदलायला हवं. नदीचं आरोग्य हेच आपल्या शहराचं आरोग्य असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसालाही आपलीच कृत्ये जबाबदार आहेत. हे ध्यानात घेऊन नागरिकांनी दरवर्षी मुर्ती दान करुन पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मूर्ती संकलनाला प्रतिसाद, मात्र ...
नाशिक शहरात काल मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्री बारापर्यंत मिरवणुका सुरु होत्या. त्यांनतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आज दुपार पर्यंत निर्माल्य संकलन, मूर्ती संकलन करण्यात आले. मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. मनपाच्या सहा विभागात एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. बांधकाम विभागाने कृत्रिम तलाव उभारले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. 'मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव' या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.