Dada Bhuse : विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगाव जिल्हा निर्मितीची शक्यता, पालकमंत्री दादा भुसे यांचे सूतोवाच
Dada Bhuse : गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव (Malegaon) जिल्हा व्हावा अशी मागणी असून आपली ही तशीच इच्छा आहे.
Dada Bhuse : गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव (Malegaon) जिल्हा व्हावा अशी मागणी असून आपली ही तशीच इच्छा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) तसा निर्णय होण्याची सूतोवाच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले. नाशिकच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवणारा आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानुसार प्रत्येक विभागाने आपल्या कामातून नाशिकचे (Nashik) ब्रँडिंग जोमाने करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या नियोजन आढावा सह मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत सूतोवाच केले. गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव जिल्हा स्थापन करण्याची मागणी आहे. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ही मागणी पुन्हा जोर धरू लागली होती. त्यातच आता 28 वर्षानंतर मालेगावला पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे मालेगावकरांची अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत बळावले आहेत. नाशिकचे पालकमंत्री पद मिळाल्याने काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आयटी हब, नाशिक पुणे रेल्वे मार्ग, कार्गो हब असे अनेक विषय करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर स्थगित केलेली कामावरील स्थगिती उठविण्यात आली. त्यामुळे आता प्रत्येक विभागाने आपल्या कामातून नाशिकचे ब्रँडिंग जोमाने करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. शहरातील शिक्षण संस्था चालकांच्या बैठकीनंतर नाशिक एज्युकेशन हब व्हावा अशी मागणी पुढे आली. उद्योजकांच्या काही समस्या होत्या त्या देखील सोडवणे बाबत चर्चा झाली. नाशिकला नवीन उद्योग आले पाहिजेत, परंतु त्याबरोबर कृषी आधारित उद्योग सुरू व्हावे त्यासाठी प्राधान्य राहणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालय याच वर्षे सुरू करण्याचे नियोजन आहे त्यासाठी सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढवण्याबाबत उच्च स्तरावर निर्णय होईल आणि तसा झाल्यास भाजप बरोबर निवडणुका लढू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
कुंभमेळ्याच्या तयारीला सुरवात
धार्मिक पर्यटनाच्या विकासातून नाशिक ब्रॅंडिंग जोमाने करण्याच्या सूचना देताना सप्तशृंगी गडाच्या तिर्थक्षेत्र विकासांचे सुक्ष्म नियोजन व श्रेणीवाढ करण्याबरोबरच आगामी कुंभमेळ्यासाठी आत्तापासून यंत्रणांनी आपले नियोजन केल्यास ते २०२७ पर्यंत अंलबजावणीसाठी सोपे जाईल. जिल्हा परिषदेच्या १०० शाळा परिपूर्ण मॉडेल शाळा म्हणून निर्माण करण्यात याव्यात. यात त्यांच्या इमारत दुरूस्ती, वॉल कंपाउंड तसेच जेथे इमारती नाहीत अशा शाळा व अंगणवाड्यांचीही कामे सुरू करण्यात यावीत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील कार्यालये, रूग्णालये, शाळा सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याची टप्प्याटप्प्याने कार्यवाही करावी. जिल्हा बॅंकेची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्या परिस्थितीतून बाहेर पडताना जुन्या थकबाकीदारांकडून वसुली करावी. गरीब हलाखीच्या परिस्थितीतील शेतकऱ्यांना त्यासाठी वेठीस धरण्याऐवजी त्यांच्या समुपदेशन व समन्वयातून थकबाकी वसुलीसाठी तोडगा काढण्यात यावा.
भाजपचे आमदार नाराज नाही!
शिंदे गटाला पालकमंत्री पद मिळाले तसेच शहराशी संबंधित काही विषयांवर मुंबईत परस्पर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आणि भाजपचे आमदार नाराज असल्याची चर्चा होती मात्र दादा भुसे यांनी ती शक्यता फेटाऊन लावली. नाशिक मधील सर्व आमदारांशी चांगले संबंध आहेत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत सर्व आमदार उपस्थित होते मुख्यमंत्र्यांकडे नाशिकच्या विषयांशी संबंधित बैठक रद्द होण्यामागे भाजप आमदारांची नाराजी नव्हती तर आपल्याला हरियाणा येते का कल्याणकारी योजनेची माहिती घेण्यासाठी जावे लागले होते त्यामुळे बैठक रद्द करण्यात आली त्यामागे भाजपचा कोणताही आमदार नाराज नसल्याचे भुसे यांनी सांगितले