Nashik News : नाशिकमधील 850 एकरवरील जंगलावर कुऱ्हाड चालणार? पर्यावरणप्रेमी संतप्त...नेमकं प्रकरण काय?
Nashik News : नाशिक शहरातील 850 एकरवरील वृक्ष संपदा आणि त्यातील हजारो पशु पक्षी यांचा अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील पांजरापोळ (Panjrapol) या जागेवर उद्योगधंदे यावेत, यातून वाद निर्माण झाला असून पर्यावरण प्रेमींनी याबाबत आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी मात्र जागेवर विकासकामे होणारच असा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जवळपास 850 एकरवरील वृक्ष संपदा आणि त्यातील हजारो पशु पक्षी यांचा अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक (Nashik) शहर जस जस वाढत आहे, तास तसे नवीन उद्योग, आयटी कंपन्या शहरात प्रस्थ वाढवत असल्याचे चित्र आहे. तस बघितलं तर मुंबई पुण्यापेक्षा नाशिक हे राहण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण असल्याचे सांगितले जाते. येथील आल्हाददायक वातावरण, स्वच्छ हवा यामुळे अनेकजण पुणे मुंबई सोडून नाशिकला स्थायिक होत आहेत. मात्र अलीकडे शहरातील अनेक भागातील वनसंपदेवर कुऱ्हाड चालवून उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच अंबडजवळील चुंचाळे शिवारात 850 एकरवरील पांजरापोळ जागेचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
दरम्यान अंबड-सातपूर (Ambad Satpur MIDC) परिसरात एमआयडीसी भाग असून याच परिसरात उद्योगांसाठी वाढीव जागा हवी असल्याने विधानसभेत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पांजरापोळ जंगलाची जागा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या मागणीला समर्थन दिले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींसह नाशिककर संताप व्यक्त करत आहेत. जल जंगल वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पांजरापोळ बचाव मोहीम नाशिक शहरातील पन्नासहून अधिक संस्थांनी सहभाग घेत पांजरापोळच्या वाचविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. खरं तर 850 एकरांवरील हि वृक्षसंपदा तोडण्याचा घाट सुरु असून एकप्रकारे हे वन म्हणजे नाशिकचा ऑक्सिजन प्लांट असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे पांजरापोळ?
तर पांजरापोळ नावाची नाशिकमधील प्राचीन संस्था असून गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षसंपदा त्याचबरोबर गायीचे रक्षण करण्याचे काम या संस्थेकडून होत आहे. सद्यस्थितीत पांजरापोळ जागेचा वाद निर्माण झाला आहे, त्यावरून तिढा सुरु आहे. जवळपास आठशे एकरहून अधिक जागा असलेली ही वनभूमी उद्योगधंद्यासाठी बहाल करावी असे काही स्थानिक राजकीय नेत्याचे म्हणणे आहे, मात्र नाशिककरांसह मनसेचा या गोष्टीला विरोध आहे. एकप्रकारे 'सेव्ह पांजरापोळ' अशी मोहीमच सुरु झाली आहे. शिवाय माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 'सेव्ह पांजरापोळ' मोहिमेला समर्थन दिले आहे. या जागेवर उद्योगधंदे करण्यासाठी ठाकरे यांनी देखील विरोध दर्शवला आहे.
अनेक पशु पक्ष्यांचा अधिवास
आठशे हुन अधिक एकरवर साकारण्यात आलेले पांजरापोळ हे नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी म्हणून ओळखले जाते. या जागेत अनेक पशु पक्ष्यांचा अधिवास आहे. त्याचबरोबर दीड हजार गायीचे संगोपन केले जाते. या जंगलात चारा लागवड, फळबागा, हजारो देशी वृक्ष, अडीच लाखाहून अधिक वृक्ष, मोर, विविध पक्षी, वन औषधींचा खजिनाच अनुभवायला मिळतो. शिवाय पांजरापोळला पर्यटन संचालनालयाकडून एकदिवशीय कृषी पर्यटन सहल केंद्र म्हणून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरात 26 वन तळी तयार करण्यात आली आहेत.