Nashik Hoardings : नाशिककर होर्डिंग लावायचंय? अशी आहे नियमावली, 14 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम
Nashik Hoardings : नाशिक शहरात होर्डिंग लावायचा असल्यास आता नवी नियमावली जाहीर केली आहे.
Nashik Hoardings : नाशिक (Nashik) शहरातील होर्डिंग्जवर (Hoardings) आता क्यूआर कोड (QR Code) अनिवार्य होणार आहे. होर्डिंग्ज लावणाऱ्या संस्था, एजन्सी यांना फलकावरील QR कोडची खात्री करावी लागेल. यासाठी 14 डिसेंबरनंतर अनधिकृत होर्डिंग (Illegals Hoardings) आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंग गर्दी वाढू लागली आहे. शहरातील चौकाचौकात अशी होर्डिंगबाजी दिसून येत असल्याने नाशिक मनपाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या 14 डिसेंबर पूर्वी असे होर्डिंग बॅनर फलक स्वतःहून काढून घ्यावे, अन्यतः नाशिक मनपाकडून शहरातील अनधिकृत फलकांना हटविण्यात येईल. या सर्वांसाठी येणारा खर्चही संबंधितांकडून वसूल करणारा असल्याचे उपायुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले. नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगमुळे होणाऱ्या विद्रूपीकरणाची समस्या लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका दाखल होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग हटवणे व लावणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईच्या आदेश दिले, मात्र त्याचे पालन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून झाले नसल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.
नाशिक मधूनही सामाजिक कार्यकर्ते रतन लत यांनी अनधिकृत होर्डिंग विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सहा वर्षे चाललेल्या सुनावणी अंती न्यायालयाने 31 जानेवारी 2017 रोजी अंतिम आदेश जारी करत अनधिकृत होर्डिंग फलकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासन तसेच महापालिकांना दिले होते. अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाईसह शहर विद्रूपिकरण केल्याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी न्यायालयाने दोन टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिले होते. याशिवाय एक एका भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे तक्रार करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
शहरात सध्या खाजगी जागांवर 832 पेक्षा जास्त होर्डिंग्ज आहेत, तर मनपाने केवळ 28 जागा खाजगी संस्थांना होर्डिंगसाठी भाड्याने दिल्या आहेत. दरम्यान महापालिकेची नाजूक झालेली आर्थिक परिस्थिती अनधिकृत होर्डिंगमुळे बुडणारा महसूल तसेच शहर सौंदर्यीकरणावर होणारा परिणाम लक्षात घेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नवीन धोरण जाहीर केले. त्यानुसार आता मनपा व खाजगी जागेत होर्डिंग लावण्याबाबतचे ठिकाणे तसेच भाडे ही जाहीर करण्यात आले आहे. आता या जागा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी लावली जाणारी होर्डिंग व फलक अनधिकृत मानून कारवाई केली जाणार आहे.
अधिकृत परवानगी क्यूआर कोड हवा
कोणत्याही प्रकारचे फलक लावायचे असेल तर दहा बाय दहा या जागेची निश्चिती केली गेलेल्या ठिकाणांची माहिती घ्या. तसेच पालिका संकेतस्थळ या ठिकाणी जाऊन संबंधित ठिकाणची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान पालिकेने निश्चित केलेला जागा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी होर्डिंग लावायची असेल तर संबंधित विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात अधिकृत अर्ज दाखल करून संबंधित परवाना घ्यावा. तसेच होर्डिंग वर अर्जदारांची नावे, एजन्सी, परवाना क्रमांक, ठिकाणे, मंजूर आणि कालावधी यांचा तपशील असल्यानंतरच हे अधिकृत होर्डिंग मानले जाणार आहे. त्यामुळे आता नाशिक शहरातील होर्डिंग्जवर क्यूआर कोड अनिवार्य होणार आहे.