Nashik Shortfilm : नाशिकच्या मराठी शॉर्टफिल्मला दुसऱ्यांदा मानव अधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार, दोन लाखांचे बक्षीस
Nashik News : नाशिकच्या (Nashik) चिरभाेग मराठी लघुपटाला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Nashik News : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (National Human Rights Commission) आयोजित 8 व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत नाशिकच्या (Nashik) चिरभाेग या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सलग दुसऱ्या वर्षी वर्णी लागल्याने मराठी लघुपटाचा दिल्लीतही डंका वाजला आहे. निलेश आंबेडकर (Nilesh Ambedkar) दिग्दर्शित चिरभोग या मराठी लघुपटाला तब्बल दोन लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अलीकडच्या काळात अनेक मराठी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण शहराच्या आजूबाजूला होत आहे. तसेच अनेक नवीन दिग्दर्शक, लेखक नव्याने या चित्रपट निर्मितीकडे वळत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रसिद्ध नाटकेही महाराष्ट्रभर गाजत आहेत. याच ओघातून निलेश आंबेडकर हे देखील सामाजिक विषयांना हात घालत लघुपटाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवअधिकार आयोगाने आयोजित केलेल्या 8 व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत दिग्दर्शक निलेश आंबेडकर यांच्या "चिरभोग" (Chirbhog) या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानव अधिकार भवन येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात चिरभोगचे दिग्दर्शक निलेश आंबेडकर यांना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रुपये दोन लाख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चिरभोग : नेमकी कथा काय...
"चिरभोग" या लघुपटाची कथा निलेश आंबेडकर यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद संजय भारतीय यांनी लिहिले आहेत. राजवीर परदेशी, सुकेशिनी कांबळे, सुशीलकुमार शिर्के, सोपान भोईर, राहुल बनसोडे, सचिन धारणकर आणि राहुल सोनवणे यांनी यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चिरभोग हा एका मुलाचे समाजात जात आणि जातीनिहाय व्यवसायावरून त्याचा होणारा भेदभाव आणि जातीयते मुळे होणाऱ्या मानव अधिकारांच्या उल्लंघणावर प्रकाश टाकतो. या लघुपटाची निर्मिती राहुल सोनावणे आणि निलेश आंबेडकर यांनी केली आहे. विनायक जंगम आणि रोहित गायकवाड यांचे छायाचित्रण, मयूर सातपुते यांचे संकलन, शशिकांत कांबळी यांचे संगीत, श्वेता सवाई यांचे वेशभूषा, श्रद्धा जगदाळे यांचे उपशीर्षक, विकी मोरे यांनी साउंड आणि संदीप रायकर यांचे मेकअप या लघुपटासाठी केला आहे. यात असलेले गीत ज्ञानेश्वरी जमदाडे हिने गायले आहे.
दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार
निलेश आंबेडकर यांना मागील वर्षी हि त्यांच्या "मुंघ्यार" या कलाकृतीला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा पुरस्कार मिळाला होता. या वर्षी सलग दुसर्यांदा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी या स्पर्धेत एकूण 137 लघुपट पुरस्कारासाठी रिंगणात होते, त्यातुन 122 लघुपटांची निवड झाली. त्यातही फाइनलसाठी 06 लघुपटांची निवड करण्यात आल्यानंतर यात चिरभोगने पहिला क्रमांक मिळवत मराठी सिनेमाची मान दिल्लीत उंचावली आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात चिरभोगचे सहनिर्माते राहुल सोनवणे, कार्यकारी निर्माता सचिन धारणकर, कलाकार राजविर परदेशी, सोपान भोईर व इतर कलाकार ही उपस्थित होते.
ईतर संबंधित बातम्या :