(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकच्या पेठरोडवरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे, स्मार्ट सिटीचा रस्ता बांधणीस नकार
Nashik News : नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे असून आंदोलन करूनही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
Nashik News : नाशिकमधील (Nashik) खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे असून पेठरोड भागात तर अनेक आंदोलन (Protest) करूनही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे रस्ता बांधकामाचा खर्च वाढल्याने स्मार्ट सिटीने (Nashik Smart City) काढता पाय घेत नाशिक मनपावर काम ढकलून दिले आहे. त्यामुळे आता पेठ रोडवासियांची सुटका कधी होईल हे सांगणे कठीण झाले आहे.
नाशिक शहरातून जाणाऱ्या पेठ रस्त्याची (Peth Road) दूरवस्था झाल्याने अपघात वाढत असून खड्ड्यांमुळे स्थानिकांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच अनेकदा आंदोलनाचा पवित्रा घेऊनही काम होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशातच दोनच दिवसांपूर्वी या परिसरातील महिलांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला सपेशल परवानगी नाकारली, तर दुसरीकडे गेल्या वर्ष दोन वर्षांपासून हे काम सुरु असल्याने बांधकामाचा खर्च अवाढव्य होत असल्याने स्मार्ट सिटीने या कामातून हात काढून घेत नाशिक मनपा प्रशासनावर ढकलून दिले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक महापालिका हद्दीतील पेठरोडचा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या रस्त्याच्या बांधकामाचा खर्च 72 वरुन थेट 86 कोटींवर गेल्याने स्मार्ट सिटी प्रशासनाने हे काम करण्यास नकार दिल्याने त्यांनी पालिकेला तोंडावर पाडले आहे. पेठ रस्त्याचे काम होऊन नागरिकांची सुटका होईल असे वाटत असतानाच स्मार्ट सिटीने काम करण्यास नकार दिला. जर या रस्त्याचे काम लवकर झाले नाही तर हा खर्च थेट शंभर कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांना महिनाभर त्रास
दरम्यान नाशिक महापालिका प्रशासनाचे (Nashik NMC) याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकाना वारंवार आंदोलन करावी लागत आहे. नागरिकांचा हा उद्रेक पाहता महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम स्मार्ट सिटीने करावे असा प्रस्ताव पाठवला होता. सहा किलोमीटरच काॅंक्रिटचा रस्ता करण्यासाठी 72 कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र आता हा खर्च 86 कोटींवर गेला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रशासनाने या रस्ता बांधणीस नकार दिला आहे. स्मार्ट सिटीच्या नकारघंटनेनंतर महापालिका बांधकाम विभाग दोन कोटी तीस लाख रुपये खर्च करुन हा रस्ता खड्डेमुक्त करत त्याची डागडुजी करणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे वारंवार आंदोलन करणारे पेठरोड वासियांना आणखी महिनाभर उखडलेल्या रस्त्यावरुनच प्रवास करावा लागणार आहे. आचारसंहिता संपताच कामाची डागडुजी केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.