Nashik Crime : चहा पिता पिता ठरला अपहरणाचा प्लॅन! लहान मुलाऐवजी मोठा मुलगा पळवला, असा झाला उलगडा
Nashik Crime : चहाच्या टपरीवर प्लॅन करत सिन्नरमधून बारा वर्षीय बालकाचे अपहरण केले होते.
Nashik Crime : सिन्नर (Sinnar) शहरातील काळेवाडा येथुन चिराग कलंत्री या बालकाच्या अपहरणाचा उलगडा झाला असून या प्रकरणी तीन संशयितांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. पैशांसाठी अपहरण केल्याची कबुली या संशयितांनी दिली असून अवघ्या काही तासांत बालकांच्या अपहरणाचा उलगडा सिन्नर पोलिसांनी सोडविला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर शहरातून काल सायंकाळी 7.30 वाजता काळेवाडा येथुन अज्ञात संशयितांनी फिर्यादी तुषार सुरेश कलंत्री यांच्या 12 वर्षीय मुलाचे ओमनी कारमधून अपहरण केल्याची घटना समोर आली होती. सिन्नर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्व शक्यता पडताळून पाहत पथके रवाना केली. याबाबतची कुणकुण संशयितांना लागल्याने तसेच अपहरण झालेल्या मुलाची बातमी व्यापक स्वरूपात सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने अपहरणकर्त्यांनी घाबरून जावून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलास रात्री एक वाजेच्या सुमारास त्याच्या राहते घराच्या परिसरात मोटर सायकलवरून आणून सोडून दिले. दरम्यान या प्रकरणी तपास सुरु असताना या अपहरण प्रकरणात तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान गुरुवारी संशयितांनी ओमनी कारने कलंत्री घराच्या बाहेर येऊन फिर्यादी यांचा 12 वर्षीय चिराग हा त्याच्या इतर मित्रांसोबत गल्लीत खेळत असतांना संशयितांनी संधी मिळताच त्यास ओमनी कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले. सिन्नर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपासाला सुरवात केली. त्यानुसार नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांबरोबरच नाशिक शहर, अहमदनगर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीसांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे अपहृत बालकाचा शोध घेणेकामी ठिक-ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. त्याचबरोबर सिन्नर पोलीस ठाणे तसचे स्थानिक गुन्हे शाखेची विविध तपास पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली. घटनेचा परिसरासह जिल्ह्यातील इतर भागात प्रसार झाल्याने अपहरणकर्त्यांनी घाबरून जावून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलास रात्री 1 वाजेच्या सुमारास त्याचे राहते घराच्या परिसरात मोटर सायकलवरून आणून सोडून दिले
सिन्नर पोलिसांनी रोशन नंदू चव्हाण, यश संदीप मोरे, यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचा साथीदार आकाश भास्कर दराडे, याच्यासोबत केल्याची कबुली दिली. सदर मुलाचे वडील हे सिन्नर शहरातील मोठे व्यापारी असून त्यांचेकडे भरपूर पैसा आहे. त्यांच्या मुलाचे अपहरण केल्यास आपल्याला पाच - दहा लाख रूपये आरामात मिळून जातील असा विचार करून संशयितांनी त्यांचा तिसरा साथीदार आकाश दराडे याच्या मार्फत फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलाच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेऊन तो खेळण्यासाठी केव्हा बाहेर पडतो याची माहिती घेवुन त्याच्या अपहरणाचा प्लॅन केला. अपहरण करण्यासाठी त्यांनी 34 हजार रूपये किंमतीची मारूती ओमनी कार सिन्नर येथुन खरेदी केली होती. संशयितांनी सुरूवातीस सदर व्यापाऱ्याच्या लहान मुलास पळविण्याचा बेत केला होता परंतु, तो आरडाओरड करेल या भितीने चर्चेअंती त्यांनी तो बेत रद्द करून मोठ्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले होते.
एक महिन्यांपासून प्लॅन
दरम्यान या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक.. एकाला संगमनेरहून.. एक आरोपी चहाची टपरी चालवतो, दुसरा महाविद्यालयीन विद्यार्थी, तिसरा कंपनीतील कामगार. एक महिन्यांपासून प्लॅन रचला होता. चहा पित असतांना पैसे कमावण्यासाठी हा प्लॅन ठरला, आरोपींनी मोठ्या व्यापाऱ्यांचा शोध घेतला. कलंत्रीच्या लहान मुलाऐवजी मोठा मुलगा त्यांनी पळवला. खोके तयार ठेवा आणि पोलिसांना कळवू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील असा चिरागच्या आईला फोन आला होता. या प्रकरणात आणखी तीन आरोपी असण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरु आहे.