(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Chhagan Bhujbal : बळीराजाच्या पिकांची होळी, सरकार मात्र धुळवड खेळण्यात दंग; छगन भुजबळ संतापले!
Nashik Chhagan Bhujbal : बळीराजाच्या पिकांची होळी, सरकार मात्र धुळवड खेळण्यात दंग, छगन भुजबळ संतापले!
Nashik Chhagan Bhujbal : राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे होळी (Holi) साजरी होत असतांना शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली. तर धुळवडीचे (Dhulivandan) रंग खेळले जात असतांना शेतकऱ्यांचे जीवनच बेरंग झालं. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरात राज्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आल्यावर 350 कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी आहे. आपल्या पेक्षा लहान राज्य असून त्यांनी ही मदत केली. मग अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही? असा सवाल छगन भुजबळ यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादकांसह इतर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानंतर धुळवड देखील राज्यभरात साजरी करण्यात आली. यात सरकारने देखील धुळवडीला रंग उधळले. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळीने होळी केली. अशातच विधानभवन (Vidhanbahavn) कामकाज चार दिवसांनंतर सुरु झाल्यानंतर आज भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरकारला धारेवर धरले. छगन भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले असून काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या कराव्या लागणार आहे. त्यामुळे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत...
राज्यभरात अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आपलं तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होत असताना माय माऊली देखील आपण तोंड बडवून घेत रडत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. याबाबत आपण सभागृहात भूमिका मांडली. अद्यापही नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नाशिक जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांद्याला भाव न मिळत असल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. गुजरात सारखे छोटे राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयांची मदत करत आहे. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असताना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी आज सभागृहात उपस्थित केला.
आजच सविस्तर निवेदन देण्यात येईल...
आपल्या राज्यातील शेतकरी अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत आला आहे. ही परिस्थिती आता हाताबाहेर चालली असून शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करावी. सभागृहात यावर चर्चा करून आजच्या आज निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी बोलतांना केली. या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तात्काळ मदत करण्यात येऊन आजच सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.