Nashik Leopard : आईचचं काळीज ते! ती पुन्हा आली अन् थंडीत कुडकुणाऱ्या पिल्लांना कुशीत घेतलं!
Nashik Leopard : आईच लेकरू दिसलं नाही कि तिचा जीव कासावीस होतो, तसंच काहीस बिबट मादीच झालं...!
Nashik Leopard : आईच लेकरू हरवलं कि तिचा जीव कासावीस होतो. कधी लेकरू मिळेल अन् त्याला कधी कुशीत घेईल, अशी आईची अवस्था असते. मग ती कोणतीही आई असो... अगदी असंच बिबट मादी संदर्भात घडलं. नाशिक (Nashik) शहरातील पाथर्डी परिसरात ऊस तोडणीच्या वेळी सापडलेल्या तीन पिल्लांना वनविभागाच्या मदतीने बिबट मादी (Leopard) आणि पिल्लांची भेट (Leopard Kids) घडवुन आणल्याची सुखद घटना घडली.
नाशिक शहराला बिबट निदर्शनास येण्याच्या घटना काही नवीन नाही. मळे परिसर असलेल्या नाशिक शहरात अनेकदा बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. त्या त्या वेळी वनविभाग आणि इको एको संस्थेच्या माध्यमातून पिल्लांची भेट घडवून आणली आहे. दरम्यान नाशिक शहराजवळील पाथर्डी गावाशेजारी वाडीचे राम परिसरात उसाच्या शेतात तीन बछडे आढळून आले होते. नाशिक वनविभाग आणि वन्यजीव प्रेमींचे पथकाने यशस्वीरीत्या या मायलेकांची पुनर्भेट घडवून आणली. रात्रीच्या अंधारात हे बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावली.
पाथर्डी गावातील वाडीचे राम परिसरात कैलास त्रिंबक ढेमसे यांच्या ढेमसे मळ्यात मजूर उसताेड करत होते. त्याचवेळी मजूरांना 10 ते 12 दिवसांपूर्वी जन्मलेली बिबट्याची तीन बछडे आढळून आले. त्यावेळी बिबट मादी उसाच्या क्षेत्रातून भक्षाच्या शाेधात गेली. त्यांनी तात्काळ हि गोष्ट ढेमसे यांनी सांगितली. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली. त्यानुसार रेस्क्यू पथक दाखल झाले. त्यांनी हे बछडे ताब्यात घेत सुरक्षित केले. दरम्यान, वनखात्याने तत्काळ उपाययाेजना करत मादी व बछड्यांचे पुर्नमिलन हाेण्यासाठी व्यवस्था उभारली. हे बछडे नुकतेच जन्मले असल्याने व त्यांना अन्य लाेकांचे हात लागण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचे मादीकडे मिलन हाेण्यासाठी कार्यवाही केली.
दरम्यान पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांचे मार्गदर्शन घेऊन परिसरात ट्रॅप कॅमेरे व बछडे व मादीचे मिलन हाेण्यासाठी रणनिती आखण्यात आली. त्यानुसार बछड्यांना मायक्रोचिप लावून पिल्लांना तेथेच त्यांच्या आईकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. रेस्क्यू टीमने सर्व पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यानंतर बिबट्याची पिल्ले तेथेच एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आली होती. कॅमेरा ट्रॅप लावून सुमारे पाचशे मीटर अंतरावर थांबून पथकाने निरीक्षण केले असता, सायंकाळी उशिरा बिबट मादी आली तिने सुरक्षितरित्या बछड्याना नैसर्गिक अधिवासात घेऊन गेली.
आतापर्यंत 20 हुन अधिक बछड्यांची पुनर्भेट
दरम्यान नाशिक शहर हे बिबट्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत बिबट मादी व बछड्यांची अनेकदा वनविभाग, वन्यजीव प्रेमींच्या पथकाने भेट घडवून आणली आहे. मागील वर्षभरात जवळपास वीसहून अधिक पिल्लांची भेट घडवून आणल्याचे वन्यजीव प्रेमी अभिजित महाले यांनी सांगितले. विशेषतः अशावेळी बिबट बछड्याना काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते. ताटातूट झाल्यामुळे बिबट मादी अग्रेसिव्ह होत असल्याने शक्य तेवढ्या लवकर बछडे आणि मादीची भेट घडवून आणणे महत्वाचे असते.