Nashik News : खबरदार! शाळा, महाविद्यालय आवारात अमली पदार्थांची विक्री कराल तर... नाशिक पोलीस सतर्क
Nashik News : नाशिक शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळं लहान मुलांचे यात अडकण्याचे प्रमाणही वाढत चाललं आहे.
Nashik News : नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने गुटखा आणि सिगारेटविरोधी मोहीम राबवून सिन्नर, निफाड, मालेगाव या तालुक्यांमध्ये कारवाई करीत 15 टपरीचालकांविरोधात गुटखा प्रतिबंध व अन्य प्रतिबंधित पदार्थाच्या विक्री प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक शहरात (Nashik City) गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिकाधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळं लहान मुलांचे यात अडकण्याचे प्रमाणही वाढत चाललं आहे. अशातच अमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये सिगारेट पान मसाला, गुटखा यासारख्या व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत असून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणावर धूम्रपान बंदी (Drugs) लागू करण्यात आली आहे. मात्र या गुटखा आणि धूम्रपान बंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात विविध टपरी चालकांकडून विद्यार्थ्यांना या पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या विक्री विरोधात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी, पवारवाडी, चांदवड, आयेशानगर, त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer), रमजानपुरा, लासलगाव, सायखेडा व जायखेडा पोलीस (Nashik District Police) ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणांजवळ असलेल्या 15 टपरी चालकांवर ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने कारवाई करीत कोटपा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाळा, महाविद्यालयांकडे लक्ष देणे आवश्यक...
महाराष्ट्र राज्यात शासनाने 18 वर्षांखालील बालकांना सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी केलेली आहे. असे टपरीचालक ही उत्पादने 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन बालकांना विक्री करताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी विविध कंपन्यांचा सुगंधीत पान मसाला, तंबाखू, सिगारेट व गुटखा असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक शहरातील पानटपरी, गल्लीबोळ विशेष विशिष्ट ठराविक भागात रिक्षातून मालपुरवठा केला जातो. काही शाळेबाहेर विक्री करत असल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील तरुणही अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पोलिसांसह प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज असून शहर ड्रग्सच्या विळख्यात जाण्यापूर्वी रोखणे महत्वाचे असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.