Nashik News : मोबाईलला 4 जी नेटवर्क, पण गावात ना धड रस्ता, ना आरोग्याची सुविधा, रुग्णांचा डोलीतून प्रवास
Nashik News : पेठच्या मोहूलीपाड्यात जिओचे नेटवर्क आहे, मात्र एखाद्या रुग्णाला न्यायला धड रस्ता नसल्याचे वास्तव आहे.
Nashik News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दणक्यात साजरा होत आहे. अमृत महोत्सवाच्या अनेक कार्यक्रमांना उधाण आले आहे. 'शासन आपल्या दारी' म्हणत शासन लाखोंचा खर्च करून मोठा महोत्सव भरवत असत. हजारो लोक येऊन लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत. दुसरीकडे आजही रुग्णांना डोली करून दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागत असेल तर कशाला हवाय? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. नाशिकच्या (Nashik) आदिवासी तालुक्यात यापूर्वीही अनेकदा रुग्णाला डोलीतून न्यावे लागत असल्याचे समोर आले होते, मात्र आजही परिस्थिती जैसे थे आहे.
नाशिक Nashik District) जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील आजही काही गाव पांड्याना जिओचे नेटवर्क आहे, मात्र एखाद्या रुग्णाला न्यायला धड रस्ता नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नेहमीच अशा विदारक प्रसंगातून इथल्या आदिवासी बांधवाना समस्या अडचणींना तोंड द्यावे लागते. अशाच पेठ तालुक्यातील मोहपाड्यात रस्त्यांची सुविधा नसल्याने गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात न्यावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना महिलेला चक्कर आली, नेहमीप्रमाणे तिला कुटुंबीयांनी डोली करत दोन किलोमीटर पायी चालत उंबरपाडा गाठले. त्यानंतर तेथून खासगी वाहनाने पेठच्या ग्रामीण दवाखान्यात नेले.
पेठ तालुक्यातील (Peth Taluka) सुरगाणा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मोहुलीपाडा येथील शेतकरी मीनानाथ सदू भोये दुपारी शेतात काम करताना अचानक चक्कर आली. यावेळी त्यांना पेठ ग्रामीण रुग्णालयात नेताना तात्काळ पोहचवण्यास मोठी कसरत करावी लागली. ही वस्तुस्थिती मोहुलीपाडा येथील लोकांची रस्त्याअभावी पाचवीला पूजलेली असुन डोली शिवाय पर्याय नाही. या रुग्णाला नेण्यासाठी डोलीद्वारे मोहुलीपाडा ते उंबरपाडा येथे दोन किलोमीटर अंतर पार करत न्यावे लागले. मोहुलीपाड्याची लोकसंख्या जेमतेम 256 च्या आसपास आहे. या पाड्यात अद्याप जि. प. शाळा नसल्याने इतरत्र 20 ते 25 मुलांना शाळेत जावे लागत आहे. काही मुलं पायपीट करीत सुरगाणे जि. प. शाळेत 2 की. मी. पायपीट करीत जात असतात. या पाड्यावर एखादा रुग्ण आजारी पडल्यास उंबरपाडा येथील नर्स अथवा जोगमोडी किंवा पेठ ग्रामीण रुग्णालय याशिवाय पर्याय नाही.
कुणाचंच लक्ष नाही....
एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे, त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना सर्वसामान्यांच्या हाल कुणीही पाहत नाही. गावाला रस्ता नाही, शाळा नाही, बांध, दरी-कपाऱ्यातून इथल्या रुग्णांना डोलीतून न्यावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास नसल्याने रुग्णाची हेळसांड होतं आहे. सर्वच रुग्णांना आरोग्य उपचारासाठी रस्त्याअभावी डोलीशिवाय पर्याय नाही, अशा परिस्थितीत गावकरी आपल्या समस्यांना नेहमीच वाचा फोडत असताना याकडे कुणाचे लक्ष नसल्याचे गावकरी सांगतात.