(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीसह सात बाजार समित्यांची मतमोजणी, कुणाचं पारडं जड?
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीसह लासलगाव, पिंपळगाव, मालेगाव, चांदवड, येवला आणि नांदगाव बाजार समित्यांची मतमोजणी आज सुरु झाली आहे.
Nashik APMC Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांची (Bajar Samiti Election) निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कालच पाच बाजार समित्यांचा निकाल उशिरा हाती आला त्यानंतर आज सकाळपासून मतदान झालेल्या उर्वरित सात बाजार समित्यांची मतमोजणी सुरु झाली आहे. यात नाशिक बाजार समितीसह लासलगाव, पिंपळगाव, मालेगाव, चांदवड, येवला आणि नांदगाव बाजार समित्यांची मतमोजणी आज सुरु झाली आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील बारा बाजार समिती (APMC Election) निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल कालच्या पाच बाजार समित्यांच्या निकालावरून दिसून आला. यात मात्तब्बरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यात घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, सिन्नर या बाजार समित्यांमध्ये स्थानिक नेत्यांनी दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चारली. सिन्नरला तर माणिकराव कोकाटे आणि वाजे यांच्या पॅनलमध्ये झालेल्या लढतीत सामना बरोबरीत झाला. त्यामुळे येथील सभापती पदचिठ्ठीद्वारे निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आज नाशिक, पिंपळगाव, चांदवड, येवला, मालेगाव, नांदगाव आणि लासलगाव येथील बाजार समित्यांचा निकाल हाती येणार आहे.
दरम्यान आज मतमोजणी (APMC Vote Counting) होत असलेल्या बाजार समित्यांचा विचार केला तर नाशिक बाजार समिती मध्ये चुरशीची लढत होणार यात शंका नाही. दोन्ही मातब्बर नेते असून देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे या दोघांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे आहेत. आज दुपारपर्यंत कोणाच्या हाती नाशिक बाजार समितीच्या चाव्या जाणार हे स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर विरुद्ध ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम असल्याने ही बाजार समिती निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्या घमासान सुरु असताना मालेगाव बाजार समितीमध्ये दोन्ही पॅनल समोरासमोर आहेत. त्यामुळे येथील निकालावर आगामी काळातील राजकारण अवलंबून असणार आहे.
तर सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखली जाणारी लासलगाव बाजार समिती निवडणूकीत सुवर्णा जगताप, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. तर येवला बाजार समितीमध्ये छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे दराडे बंधू भुजबळांच्या सामने असल्याने हि निवडणूक महत्वाची मानली जात आहे. या सहा बाजार समित्यांची निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली असून काही वेळातच निकाल हाती येणार असल्याचे चित्र आहे.
पाच बाजार समित्यांचा निकाल
नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी आज पाच बाजार समित्यांचा निवडणूक निकाल घोषित झाला असून सिन्नर बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलला समसमान मते मिळाले आहेत. तर दिंडोरीत शिवसेनेच्या चारोस्कर यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलला धूळ चारली आहे. देवळा बाजार समिती शेतकरी विकास पॅनलने विजय संपादन केला आहे. तर घोटीमध्ये देखील गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल 16 जागा जिंकत विजय मिळवला आहे.