Chatrapati Sena : आजवर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता, मात्र नाशिकची 'ही' संघटना शिंदे गटासोबत..!
Chatrapati Sena : आजवर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या नाशिकच्या (Nashik) छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
Chatrapati Sena : राज्यात शिंदे ठाकरे (Thackeray) गटात पक्ष बांधणी संघटन बांधणी वरून जोरदार घमासान सुरु असून एकमेकांवर आरोप प्रत्या रोपांमुळे दोन्ही गट चर्चेत आहेत. शिवाय शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटात व इतर संघटना, पदाधिकारी हे प्रवेश करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमधून शिंदे गटाला महत्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. आजवर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिकमधील शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाचे शिलेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राज्याच्या विविध ठिकाणी गाठीभेटी घेत असून अनेक संघटना संध्या शिंदे गटासोबत जोडल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी नाशिकला (Nashik) कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती सेनेने भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी छत्रपती सेनेचे शिष्ट मंडळ मुंबईत भेटीसाठी गेले होते. दरम्यान भेटीनंतर छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्रासहित काही अटी शर्तीवर वर पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती सेना कार्यरत असून आजवर कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीसोबत ही संघटना जोडली गेली नाही. काही सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संघटना मुख्यमंत्र्यांना जोडली गेली असल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने प्रगती व विकास घडेल असे चित्र मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झाले असून ते सत्यात उतरेल अशी आशा असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे. राज्यात 23 जिल्ह्यांत संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून सुमारे 90 हजार युवक-युवती जोडले गेले आहेत. काही प्रश्नांसंदर्भात छत्रपती सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालत सोडविण्याची मागणी केली आहे.
छत्रपती सेनेने अटी शर्तीवर दिला पाठींबा
छत्रपती शिवाजी महाराज व अखंड भारताचे प्रेरणास्रोत माँसाहेब जिजाऊ यांचे पूर्णाकृती स्मारक व शिवालय नाशिकमधील छत्रपती शिवाजी उद्यान सीबीएस येथे उभारावे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शासनाने राज्य फेरीवाला महामंडळ स्थापन करावे, छत्रपती सेनेच्या माध्यमातून फेरीवाला रोल मॉडेल म्हणून नाशिक सेंट्रल मार्केटच्या उभारणीचे काम सुरू असून, त्यास विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, सारथी संस्थेमार्फत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी, नाशिक-सिन्नर रस्त्यावरील टोलनाका बंद करावा, शाळा व महाविद्यालयांजवळील टवाळखोरी बंद करावी आदी मुद्द्यांवर छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दर्शविल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष नीलेश शेलार यांनी पत्रकात म्हटले आहे.