Udhhav Thackeray : 'शिवसेना सोडायला नको होती', उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर भुजबळ झाले भावुक
Udhhav Thackeray : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जेव्हा शिवसेना (Shivsena) सोडली, तेव्हा ठाकरे कुटुंबियाला मानसिक धक्का बसला होता.
Udhhav Thackeray : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जेव्हा शिवसेना (Shivsena) सोडली, तेव्हा ठाकरे कुटुंबियाला मानसिक धक्का बसला होता. त्यावेळी भुजबळांनी मातोश्रीवर येत सर्व मतभेद मिटवून टाकले होते. मात्र भुजबळांनी शिवसेना सोडायला नको होती, अशा आशयाचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी केले. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित छगन भुजबळ शिवसनेच्या आठवणीत रमून गेल्याचे पाहायला मिळाले. शिवाय उद्धव ठाकरे बोलत असताना छगन भुजबळ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवस (Chhagan Bhujbal Birthday) साजरा होत आहे. त्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. भुजबळांचे कौतुक करण्याची आवश्यकता नाही, आवश्यकता असती, आपण सगळे एवढी गर्दी केली नसती. अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), थोरात आपण सर्व एका व्यासपीठावर बसणार आहोत, मागच्या दोन वर्षात कल्पनाही केली नव्हती. आज भुजबळांचा 75 वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा. भुजबळ यांनी राजकारणाची सुरवात शिवसेनेतून केली, पहिली निवडणूक ते हारले, मात्र त्यानंतर जिद्दीने उभे राहिले. आणि आज तुमच्यासमोर 75 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मात्र ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी ठाकरे कुटुंबाला पहिला आणि मोठा धक्का होता, अशी खदखद माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
यावेळी उद्धव ठाकरे छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असताना ठाकरे यांनी भुजबळांच्या शिवसेनेच्या काही आठवणी सांगितल्या. यावेळी व्यासपीठावर बसलेले छगन भुजबळ हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे उद्धव ठाकरे बोलत होते तर दुसरीकडे भुजबळ हे विचारात मग्न असल्याचे दिसून येत होते. जणू काही भुजबळ हे शिवसेनेच्या आठवणीत गेल्याचे चित्र दिसत होते. 'भुजबळांनी शिवसेना सोडायला नको होती', यावर भुजबळांनी उसासा टाकत गहिवरले.
दरम्यान उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर त्या आधीच मुख्यमंत्री झाले असते, सरकार वाकविण्यात ते खूपच पटाईत आहेत, ते आधी सांगितले पाहिजे होते. मात्र भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा मोठा धक्का बसला. कुटुंबातील माणूस सोडून कसा जाऊ शकतो, त्यातून सावरताना आम्हाला खूप वेळ लागला. एक गोष्ट छान झाली, बाळासाहेब ठाकरे असताना तुम्ही सर्व सगळं मिटवून टाकले. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत जम बसविला. आज ते राष्ट्रवादीचे वादळी नेते म्हणून ओळखले जातात. दोन उत्तुंग व्यक्तिमत्व भुजबळांना लाभली आहेत. या दोन्ही नायकांचे मार्गदर्शन भुजबळांना भेटले, म्हणून अजूनही भुजबळ तरुण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुस्तकाचे प्रकाशन
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला, प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सामंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.