Shasan Apalya Dari : नाशिकच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल
Nashik Traffic : नाशिक (Nashik) शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Nashik News : दोन तारखा रद्द झाल्यानंतर अखेर नाशिक (Nashik) जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शनिवारी 15 जुलै रोजी होत आहे. शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल (Traffic Route Change) करण्यात आले असून, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे नाशिककरांना उद्याच्या दिवशी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम दोन तारखा रद्द झाल्यानंतर अखेर उद्या शनिवार रोजी होत आहे. नाशिक (Nashik) शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार असून शासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार रोजी डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने नाशिक शहरातील वाहतुकीत बदल करण्यात असून, नाशिककरांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त सकाळी सहा वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल, गोल्डन जिम ते ठक्कर बंगला, जुना गंगापूर नाका सिग्नल ते अहिरराव फोटो स्टुडिओ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये सुमारे पाचशे एसटी बसेस, शंभर सिटीलिंक बसेस व सुमारे दोन हजार खासगी चारचाकी वाहने येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शहरात येणार्या बाहेरगावच्या सर्व बसेस ईदगाह मैदान त्र्यंबक रोड किंवा श्रद्धा लॉन्स कोशिरे मळा किंवा पेठ रोडवरील मार्केट यार्डात पार्क कराव्या लागणार आहेत, तर चारचाकी वाहनांसाठी केटीएचएम कॉलेज गंगापूर रोड आणि बी. वाय. के. कॉलेज, कॉलेज रोड या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुचाकी वाहनांसाठी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड आणि बी. वाय. के. कॉलेज व कॉलेज रोड येथे वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
या पर्यायी मार्गाचा अवलंब करा...
शासन आपल्या दारी या कालावधीत स्थानिक वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. यात गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहने जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स मार्गे मॅरेथॉन चौकात येऊन अशोकस्तंभाकडे जाऊ शकतील, तर अशोकस्तंभाकडून मॅरेथॉन चौकाकडे जाताना जुनी पंडित कॉलनी मार्गे राणे डेअरी व इतर ठिकाणी जाता येईल. गंगापूर रोडने जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड मार्गे इतरत्र जाऊ शकतील.
कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांसाठी
दरम्यान कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनधारकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील ईदगाह मैदान येथे पार्क केलेल्या बसेस तेथून सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभमार्गे कार्यक्रमस्थळी आणता येतील. जाताना गंगापूर रोड-जेहान सर्कल-भोसला टी पॉईंट- महात्मानगर मार्गे -त्र्यंबक रोडने ईदगाह मैदान येथे जाता येईल.
सिटीलिंक बसेसचा मार्ग
शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे शहरातील सिटीलिंक बसेसचा मार्गही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सिटीलिंक बसेस या ईदगाह मैदान-सीबीएस- अशोकस्तंभ-मॅरेथॉन चौकातून कार्यक्रमस्थळी येतील. जाताना गंगापूर नाका-जेहान सर्कल-भोसला टी पॉईंट मार्गे महात्मानगर-एबीबी सर्कलकडून ठक्कर डोम येथे पार्किंगसाठी जातील. वरीलप्रमाणे नियोजन असून, नाशिककरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात मॅरेथॉन चौक ते गंगापूर रोड, चोपडा लॉन्सजवळ आ. फरांदे यांच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता आणि कॅनडा कॉर्नरवर अहिरराव फोटो स्टुडिओ कॉर्नर, तसेच पंडित कॉलनीतील ठक्कर बंगला येथे बॅरेकेटिंग केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
