Nashik News : संतापजनक! झाडाच्या बुंद्यावरच अॅसिड टाकून जाळण्याचा प्रकार, नाशिक शहरातील घटना
Nashik News : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात काही झाडांच्या बुंध्यावरच अॅसिड (Acid) टाकून जाळण्याचा क्रूर प्रकार घडला आहे
Nashik News : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरातील बॉस्को सेंटर जवळील काही झाडांच्या बुंध्यावरच अॅसिड (acid) टाकून जाळण्याचा क्रूर प्रकार घडला आहे. नाशिकमध्ये अनेक पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनासाठी झटत असताना अशा प्रकारे झाडांचा जीव घेण्याचा किळसवाणा प्रकार घडल्यामुळे निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वृक्ष तोडीसंदर्भात महापालिका कठोर पाऊले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार पुत्राने अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने त्यांना दंड ठोठावला होता. असे असताना मात्र गंगापूर रोड परिसरात रस्त्यावर कडेला असणाऱ्या वृक्षांवर अज्ञातांकडून ऍसिड टाकण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय. दिवसाढवळ्या वृक्ष तोड केल्यास नागरिकांच्या निदर्शनास येईल, किंवा मनपा प्रशासनास माहिती होईल. त्यामुळे संबंधित नागरिकांकडून या वृक्षांना तोडण्यायोग्य बनविण्यासाठी ऍसिड टाकून झाडाचा जीव घेत आहेत. ऍसिड टाकल्यानंतर झाड जळते, त्यानंतर कमकुवत झाल्याने उन्मळून पडते.
नाशिक मनपा प्रशासन वृक्ष संवर्धनासाठी वेगवेगळेया उपयाययोजना राबवित असताना अशा वेगवेगळ्या मार्गाने अस्तित्त्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गंगापूर रोडवरील घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे नवनियुक्त उद्यान उपायुक्त मुंढे व व्रुक्ष अधिकारी बोडके यांनीही तातडीने सदर जागेस भेट दिली. अधिकाऱ्यांच्या मते झाडांच्या बुंध्यावर आठ ते दहा दिवसांपूर्वी ऍसिड टाकण्यात आले आहे. मात्र पावसामुळे ऍसिडची परिणामकारकता कमी झाल्याने वृक्ष यातून वाचल्याचे त्यांनी सांगितले. साधारण चार झाडांवर हे ऍसिड टाकण्यात आले असून कुणी टाकले का टाकले याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र लवकरच याच शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकारी बोडके यांनी दिले.
निसर्गप्रेमी झाडांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी नेहमी झटत असतात. वृक्ष लागवडीसाठी शासन व सामाजिक संस्था अनेक वेळा पुढाकार घेतात. यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने झाडांचे महत्त्व अधिकच जाणवत आहे; मात्र काही महाभागांकडून झाड नष्ट करण्यासाठी झाडाच्या बुंद्यावर अॅसिड टाकून ते जाळण्याचा प्रकार झाल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पर्यावरण प्रेमी अंबरीश मोरे म्हणाले कि, गंगापूर रोड परिसरात चार झाडांना ऍसिड टाकून मारायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सर्व चार झाडांची बाहेरची साल जळालेली असून फक्त निसर्गाच्या कृपेने वेळेवर पाऊस पडल्याने ऍसिडची तीव्रता कमी झाल्याने झाडे अजूनही जिवंत आहेत. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेची तपासणी केली, यावेळी झाडांना ऍसिड टाकलेले आहे हे स्पष्ट झाले. एक एक झाड अत्यंत महत्त्वाचे असल्याने अशा पद्धतीने होत असलेले प्रकार वेळीच थांबविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.