Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या ओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांचा निर्णय
Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या (Nashik) ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली आहे.
Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या (Nashik) ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत आता रद्द करण्यात आली आहे. लम्पि आजाराच्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला असून प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यावर विचार केला जाणार आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी नाशिकजवळील ओझर (Ojhar) परिसरात खंडोबा यात्रेच्या (Khandoba Yatra) निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते. खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात राज्यभरातून बैलगाडा शर्यत प्रेमी ओझर मध्ये दाखल होतात. मात्र राज्यासह जिल्ह्यात लम्पि आजाराचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खंडोबा यात्रेनिमित्त होणारी शर्यत आता रद्द करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लम्पिचा (Lampy) प्रादुर्भाव असून यासाठी पशु संवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याच प्रादुर्भावाचा विचार करता प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. खंडोबा यात्रेनिमित्त या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले होते. खंडोबाची यात्रा असते आणि त्यानंतर या बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते.
गेल्या काही महिन्यांपासून लम्पि आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झालेला आहे. ही साथ फोफावत असल्याने ओझर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आयोजकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय एक मुखाने घेतलेला आहे. जोपर्यंत लम्पि ची साथ कमी होत नाही, तोपर्यंत पुन्हा बैलगाडा शर्यत चे आयोजन करण्यात येणार नाही, त्यामुळे सध्या तरी ही बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण लम्पि आजाराचा नायनाट होत नाही, तोपर्यंत शर्यत बंद राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने की यात्रा घेतली जाणार आहे.
नाशिकमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव
नाशिक जिल्ह्यात लम्पीच्या साथीने आतापर्यंत 83 जनावरे दगावली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी शासकीय मदतीबाबत सतर्क राहून आतापर्यंत 75 प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 75 पशुपालकांना 19 लाख 39 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 692 जनावरांना बाधा झाली असून त्यापैकी 01 हजार 309 जनावरे पूर्णपणे अंबरी झाली आहेत. जिल्ह्यातील 300 जनावरे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण झाले आहे.
मागील वर्षीची वादग्रस्त बैलगाडा शर्यत
दरम्यान मागील वर्षी ओझर शहरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विनापरवानगी ही बैलगाडा शर्यत आयोजित केल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे अमोर आले होते. अखेर पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने शर्यत अखेर बंद करण्यात आली होती. तर त्याच सुमारास दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर शिवारात विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीलाही हजारो जणांची उपस्थिती आणि शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते.