Nashik Loksabha Election : नाशिक, दिंडोरी लोकसभेचे काय ठरलं? भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादीची रणनीती काय? असं आहे गणित!
Nashik Loksabha Election : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले असून निवडणूक जाहीर झाल्यावरच नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.
Nashik Loksabha Election : लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) बिगुल कधी वाजेल हे सांगता येत नाही. मात्र इच्छुकांची गेल्या वर्ष दीड वर्षांपासून तयारी सुरू आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले असून निवडणूक जाहीर झाल्यावरच नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका कधी जाहीर होतात, याकडे सर्वच पक्षांचे डोळे लागून आहेत.
नाशिक लोकसभेसह (Nashik Loksabha) इतर लोकसभांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र कोणत्याही क्षणी या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. नाशिक लोकसभा निवडणूक देखील सर्वच पक्षांसाठी महत्वाची सद्यस्थितीत ही जागा शिवसेनेकडे म्हणजेच सध्याच्या ठाकरे गटाकडे आहे. मात्र शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने सर्वच चित्र बदलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही घटना जशी राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारी ठरली, त्याचप्रमाणे नाशिकच्या राजकारणावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटासह (Thackerya Sena) भारतीय जनता पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेत शिंदे गटाला डावलून नवा उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) चे सरकार आहे. दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे आता दोन गट पडल्याने आगामी निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती होईल की नाही हे निवडणूक जवळ येईल तसे समोर येईलच. मात्र उद्धव ठाकरे गट देखील नवा गडी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत भाजप- शिंदे गट, उद्धव ठाकरे गट या पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिंदे गट आणि भाजपची सध्या युती आहे. दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) शिंदे गटात गेले. त्यामुळे आता शिंदे गटातून हेमंत गोडसे कि भाजप शिंदे गटाला डावलून नवा उमेदवार देईल का? असाही प्रश्न आहे. दुसरीकडे नाशिक लोकसभा ही शिवसेनेची जागा आहे. गेल्या दोन निवडणुकीत हेमंत गोडसे हे निवडून आलेले आहेत. मात्र ते आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव सेनेकडून नवा उमेदवार दिला जाणार यात शंका नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाकडून ही जागा लढवली जाते. आता ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) आहे. त्यामुळे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस उमेदवार देईल का? हे निवडणूक जाहीर झाल्यावरच समोर येईल. मात्र या दोन्ही पक्षांपैकी एकाने जरी उमेदवार दिला तरी ठाकरे गटाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता असून समीकरणे बदलणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांचे मनसुबे समोर येणार आहेत.
नाशिक लोकसभेसाठी नेमके चेहरे कोणते?
आता पक्षांच्या इच्छुक उमेदवार पाहिले तर भाजपकडून अद्याप आश्वासक चेहरा समोर आलेला नाही. मात्र गेल्या एक दीड वर्षांपासून दिनकर पाटील हे मतदारसंघात फिरत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांना आश्वासन दिले असल्याचे काही कार्यक्रमामधून दिसून आले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून हेमंत गोडसे लोकसभेचा चेहरा असण्याची शक्यता आहे. मागील दोन निवडणुकीत ते निवडून आलेले आहेत. मात्र गोडसे हे उद्धव यांची साथ सोडत शिंदे गटात गेल्याने त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. ठाकरे गटाकडून अनेक नावाची चर्चा आहे. त्यात जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे या तिन्ही पक्षांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीला बगल देऊन उमेदवार देतील का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नाशिक दौरे करत असलेले छत्रपती संभाजीराजे हे देखील लोकसभेच्या तयारीत असल्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे यंदाची नाशिक लोकसभा चुरशीची होणार यात शंका नाही..
दिंडोरी लोकसभेचे काय?
आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असलेला दिंडोरी मतदार संघ पुर्वी मालेगाव मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. या मतदार संघात पूर्वी कॉंग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिलेला आहे. परंतु गेल्या चार निवडणूकांपासून हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. नाशिक लोकसभेप्रमाणे दिंडोरी लोकसभा देखील चर्चेत असणारी आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार या विद्यमान खासदार आहेत. शिवाय पहिल्याच निवडीत त्यांना केंद्रीय मंत्री पद देखील बहाल करण्यात आले आहे. मात्र यंदा हे चित्र बदलणार का? हे पाहावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाची पकड आहे. प्रत्येक पंचवार्षिकला राष्ट्रवादीकडून भाजपला तगडे आव्हान देण्याचे काम केले जाते. यंदा हे चित्र काय असेल हे निवडणूक जाहीर झाल्यावर स्पष्ट होणार आहे.