MLA Suhas Kande : आमदार कांदेकडून शिंदेच्या अभिनंदनार्थ जाहिरात, ठाकरे पिता पुत्रांच्या फोटोने आश्चर्य
MLA Suhas Kande : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी शिंदे यांच्या अभिनंदन जाहिराती दिल्या असून उद्धव ठाकरेंसह (Udhhav Thackeray) आदित्य ठाकरेंचे फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
MLA Suhas Kande : राज्याच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे विराजमान झाल्यानंतर राज्यातील शिंदे समर्थकांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या अनुषंगाने आमदार सुहास कांदे यांनी वृत्तपत्रांना शिंदे यांच्या अभिनंदनाच्या पानभर जाहिराती दिल्या. मात्र या जाहिरातींमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचे फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्य अखेर काल आश्चर्यकारक रित्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेचे नावावर शिक्कामोर्तब झाले. या घोषणेमुळे राज्यातील नागरिकांना एकप्रकारे धक्काच बसला. शिवाय एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याचे दिसून आले. या घोषणेनंतर गुवाहाटीत असेलेले बंडखोर आमदारांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. याचबरोबर राज्यातील अनेक भागात शिंदे समर्थकांनी आनंद साजरा केला. यात नाशिकमधील अनके शिंदे समर्थकांनी रस्त्यावर येत फटाके फोडत विजयोत्सव साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे देखील या गटात सामील होते. पहिल्या दिवसांपासून ते शेवटपर्यंत सुहास कांदे शिंदे यांच्यासोबत होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि बंडखोर आमदारांसह राज्यातील शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला. यामध्ये आमदार सुहास कांदे यांनी नाशिकमधील वृत्तपत्रांना अभिनंदनपर जाहिरात दिल्या आहेत. या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो छापण्यात आले आहेत. तसेच भाजपचे जेष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा यांचेही फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार सुहास कांदे चर्चेत
आमदार सुहास कांदे हे सध्या नांदगाव मतदारसंघात निवडून आले आहेत. कांदे हे एकेकाळी राज ठाकरेंचे कट्टर समर्थक बनले होते. मनसे नाशिक जिल्हाप्रमुख आणि त्यानंतर प्रदेश सरचिटणीस म्हणून सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 29 नोव्हेंबर 2013 ला कांदे यांनी मनसेला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 साली नांदगाव विधानसभेत त्यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 साली पुन्हा एकदा सुहास कांदे यांना नांदगाव मतदार संघातून आमदारकीची उमेदवारी बहाल करण्यात आली. पंकज भुजबळ यांचा पराभव करत भगवा फडकवला होता. काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला होता. हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे देखील कांदे यांनी याबाबत तक्रार केली होती. शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सुहास कांदे यांच्याकडे आहे. आमदार झाल्यापासून त्यांची आणि एकनाथ शिंदेंची जवळीक अधिक वाढली होती आणि आता ते थेट त्यांच्या गटात सामील झाले आहेत.