Nashik Aditya Thackeray : दावोसला गेले, 40 कोटी खर्चून आले अन् एक रुपयाही आणला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात
Nashik Aditya Thackeray : शिंदे फडणवीस सरकारने घोषणा खूप मोठ्या केल्या... पण रुपया कोणापर्यंत पोहचला नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
Nashik Aditya Thackeray : मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) दावोसला गेले, 40 कोटी खर्चून आले.. आणि रुपया पण नाही आणला. घोषणा खूप मोठ्या केल्या... पण रुपया कोणापर्यंत पोहचला नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. मी जेव्हा दावोसला गेलो, तेव्हा 4 दिवसात 80 हजार कोटी गुंतवणूक आणली होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेनिमित्त नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून नाशिकरोड येथील आनंद ऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे म्हणाले की, सरकार बदलले, चेहरा बदलला, उद्योग कुठे गेले? 40 गद्दार गेले कुठे? 3 लाख नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग गुजरातला (Gujrat) पळविले. मागच्या महिन्यात दावोसला गेले. मी जेव्हा दावोस ला गेलो तेव्हा 4 दिवसात 80 हजार कोटी गुंतवणूक आणली होती. हे गेले 40 कोटी खर्चून आले.. आणि रुपया पण नाही आणला. घोषणा खूप मोठ्या केल्या... पण रुपया कोणापर्यंत पोहचला नाही. घोटाळ्याचे घोटाळे महाराष्ट्रात होत आहे. महापालिकेत सगळीकडे प्रशासकच राज्य चाललं आहे. म्हणजे कंत्राटदार यांचं धोरण चालला आहे. जनतेचा पैसे वाचवायचे कसे हे लक्षात घेतले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच रक्त माझ्यात आहे. तुमचं आणि माझं देखील एक रक्त, कारण आपल्या रक्तात शिवसेना (shivsena) आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीच शिकवण आहे, पैसा येतो पैसे जातो पण नाव गेलं की येत नाही. ते माझ्या चॅलेंजला घाबरले आहेत. तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि आमदार पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर ठाण्यामधून उभे राहा. तिथे देखील तुम्ही पडणार असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, नाशिक हे माझं आवडत शहर आहे. मात्र आता प्रगतीत नाशिक मागे राहिले आहे. कारण तेव्हा ब्लु प्रिंटमध्ये हरवलेले होते. मग नंतर दत्तक घेणारे आले, त्यांनी काय केलं काय माहित? संधी मिळाल्यानंतर नाशिकची सेवा करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल, नाशिकचा शाश्वत विकास कसा होणार याचा विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
गद्दारांच सरकार पडणार
तसेच शिवसेना मुंबईत महापालिकेत सत्तेत आल्यानंतर 90 हजार कोटींची ठेवी जपून ठेवल्या आहे. स्थानिक राजकारणाला व्हिजन नसल्यामुळे इतर शहरातील महापालिका तोट्यात आहेत. मात्र मुंबईत 5 किलोमीटर साठी 5 रुपयात फिरता येते. मुंबईत 20 रुपयात कुठेही जाऊ शकतो. परवडणारी चांगली ट्रान्सपोर्ट सेवा सुरू केली पाहिजे. आता मार्केटमध्ये गाजर भरपूर झाली आहे. जाती जातीत भेद करणे, धर्मात भेद करणे आणि भांडण लावणे हे असे राजकारण सध्या चाललं आहे. यंदा नाशिककरांचा विश्वास देखील आपल्यावर आहे. लवकरच गद्दारांच सरकार पडणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होते तेव्हा, अडीच वर्षे गप्प का होते. शिवसेनेचं हिंदुत्व स्पष्ट आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणे हे आमचं हिंदुत्व असून 40 गद्दार आमदारांनी राजीनामा द्या आणि माझ्या समोर उभे राहा. सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा येणार अस स्पष्ट झाले आहे. म्हणून यांना भीती वाटते आणि निवडणूक घेत नाही. तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहेत का? असं त्यांनी जनतेला आवाहन देखील यावेळी केले.