Nashik Police Bharti : नाशिक पोलीस भरती : लेखी परीक्षेला 847 उमेदवारांची दांडी, अंतिम गुणवत्ता यादी लवकरच
Nashik Police Bharti : नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेस पात्र असलेल्या 1879 उमेदवारांपैकी जवळपास 847 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.
Nashik Police Bharti : नाशिक ग्रामीण शिपाई (Nashik Police Bharti) पदाच्या लेखी परीक्षेसाठी (written Exam) रविवारी (2 एप्रिल) परीक्षा पार पडली. परंतु यावेळी लेखी परीक्षेस पात्र असलेल्या 1879 उमेदवारांपैकी जवळपास 847 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. काल सकाळी साडेसहा वाजेपासून शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहरातील केटीएचम महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते.
नाशिक ग्रामीणच्या (Nashik Rural Police) 164 रिक्त शिपाई पदांसाठी 2 ते 20 जानेवारीदरम्यान मैदानी चाचणी (Ground Test) पूर्ण झाली. यात 50 टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यांची रविवारी सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. बुद्धिमत्ता, गणित, सामान्यज्ञान, मराठीसह (Marathi) विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारण्यात आले. 'बायोमेट्रिक'द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
847 उमेदवारांची लेखी परीक्षेला दांडी
ग्रामीण पोलीस दलातील शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा रविवारी सकाळी झाली. त्यात एक हजार 879 पैकी 847 उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. एक हजार 32 उमेदवारांचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे. या परीक्षेत गणिताचे प्रश्न काहीसे कठीण होते, असे उमेदवारांनी सांगितले. शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त रविवारी सकाळी साडेसहापासून परीक्षेसाठी तैनात हाेता. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर सरकारवाडा पोलीस, तर परीक्षा व्यवस्थापनासाठी ग्रामीण पोलीस कार्यरत होते.
परीक्षेचा लवकरच निकाल
नाशिक पोलीस भरती प्रक्रियेत आता शेवटचा टप्पा शिल्लक असून अर्जप्रक्रिया झाल्यानंतर मैदानी चाचणीला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा दोन पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली. यात पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी हजारहून अधिक उमेदवार पात्र झाले होते. नुकतीच शहरातील केटीएचएम महाविद्यलयात ही परीक्षा पार पडली असून लवकरच निकाल लावला जाणार आहे.
अंतिम गुणवत्ता यादीकडे लक्ष
साडेअकरापर्यंत लेखी परीक्षा संपल्यानंतर बारापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. दरम्यान, या मैदानीच्या निकालात पहिल्या 29 उमेदवारांना 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. हे सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कटऑफ 43 गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा 42, महिला 40, प्रकल्पग्रस्त 36, अनाथ 30, खेळाडू 29, भूकंपग्रस्त 26 आणि पोलीस पाल्य 25 या गुणांचा कटऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कटऑफ अधिक राहिल. त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष अंतिम गुणवत्ता यादीकडे आहे.