Nashik Corona Updates : नाशिकमध्ये एकाच दिवशी 33 कोरोना रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
Nashik Corona Updates : पुण्यापाठोपाठ (Pune) नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत आहे.
Nashik Corona Updates : पुण्यापाठोपाठ (Pune) नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. रविवारी एकाच दिवशी 33 कोराना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा (Health Department) अलर्ट मोडवर आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच नाशिकमध्येदेखील रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 74 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच 'एच3एन2 'चादेखील (H3N2) धोका असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
गेल्या आठवड्यात एकाच दिवशी 12 कोरोना रुग्ण (Corona Updates) आढळून आले होते. तर रविवारी एकदम 33 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 18 रुग्ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. तर 14 रुग्ण नाशिक (Nashik) ग्रामीण विभागात आढळून आले. मालेगावमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही. राज्यासह देशात करोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून योग्य ते निर्देश राज्य सरकार यांना दिले गेले आहेत. मास्क सक्ती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावे, असं केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. पण खबरदारी म्हणून नागरिकांनी मास्क वापरावे असं आवाहन भारती पवार यांनी केलं आहे.
देशभरात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून यासंदर्भात केंद्र सरकारने काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नाशिक शहरासह जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ बैठक देखील घेतली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्य मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. याचबरोबर नाशिकमध्ये वाढत कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन योग्य उपाययोजना करत आहेत. जेष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत अशा सूचना देखील आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
मास्क वापरण्यास सक्ती नाही, मात्र...
दरम्यान सध्याची कोरोना परिस्थिती पाहता काळजी घेणे गरजेचे आहे, मात्र पॅनिक होऊ नये. स्वतःच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणं आवश्यक आहे. मात्र सक्ती नाही. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घेणे बंधनकारक आहे. राज्यस्तवर मास्क सक्तीचा निर्णय घेता येतो. एखाद्या जिल्ह्यात जास्तीत जास्त रुग्ण आढळून आले तर स्थानिक प्रशासन याबाबत निर्णय घेऊ शकते. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी सद्यस्थितीत कोरोना बरोबरच इन्फ्लुएंझाचे रुग्णही आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा याकडे लक्ष देऊन आहे.