Nashik News : नाशिक जिल्ह्यांत 111 गावांत घराघरांत पाणी, जल जीवन मिशनद्वारे पाणी पुरवठा
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हयातील 100 टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या 111 गावांना 'हर घर जल' (Har Ghar Jal) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Nashik News : जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत जिल्ह्यात जल उत्सव अभियान राबविण्यात आले. नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत जिल्हयातील 100 टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या 111 गावांना 'हर घर जल' (Har Ghar Jal) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाव्दारे नियमित, शुध्द व 55 लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनची सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावातील 100 टक्के कुटुंबांना नळ जोडणी देऊन 55 लिटर प्रतिमाणसी शुध्द व शाश्वत पाणी पुरवठा करावयाचा आहे. तसेच गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाव्दारे पाणी पुरवठा करावयाचा आहे. या निकषानुसार पाणी पुरवठा करण्यात येणा-या गावांना शासनाच्या निर्देशानुसार हर घर जल गाव म्हणून घोषित करावयाचे आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयातील गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेकडून जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे विहित वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी सर्व यंत्रणेचा नियमितपणे आढावा सुरु आहे. विहित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी मक्तेदारांची बैठक घेण्यात आली असून कामांचा दर्जा चांगला राहिल याबाबतही निर्देश देण्यात आलेले आहेत.
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर जल गाव करणेसाठी जिल्हयात जल उत्सव अभियान राबविण्यात आले. हर घर जल गावाचे निकष पुर्ण करणा-या जिल्हयातील 111 गावांना 15 ऑगस्ट रोजी हर घर जल गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत हर घर जल गावाचे निकष पुर्ण करणा-या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेव्दारे ठराव तसेच व्हिडीओ चित्रीकरण करुन व सदरची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर मोबाईल ॲपव्दारे भरल्यानंतर जिल्हयातील या गावांना हर घर जल गाव म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली. जल उत्सव अभियान यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व सल्लागार, तालुकास्तरावरील गटसमन्वयक, समूह समन्वयक, जलजीवन मिशन अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत कंत्राटी अभियंते यांनी परिश्रम घेतले.
तालुकानिहाय हर घर जल घोषित गावांची संख्या पुढीलप्रमाणे-
बागलाण-06, चांदवड-06, देवळा-02, दिंडोरी-09, इगतपूरी-09, कळवण-13, मालेगाव-04, नाशिक-10, निफाड-09, पेठ-13, सिन्नर-16, सुरगाणा-7, त्रंबकेश्वर-04, येवला-03 गावांचा समावेश आहे.