Navratri 2022 : सप्तशृंगी देवीचे माहात्म्य, पूजा विधी, आख्यायिका आणि ऐतिहासिक महत्व
Navratri 2022 : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi Devi) दर्शनासाठी (Navratri 2022) नवरात्रोत्सवात विशेष महत्व असते.
Saptshrungi Devi Navratri : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रसिध्द असलेल्या वणी (Vani) येथील सप्तशृंगी मातेचे (Saptshrungi Devi) भव्य मंदिर असून नवरात्रात (Navratri 2022) या मंदिर परिसराला विशेष महत्व असते. नुकत्याच या मंदिरातील मूर्तीच्या कायापालट झाल्याने सप्तशृंगी देवीचे नव रूप भाविकांसमोर आले आहे. दरम्यान आगामी नवरात्री उत्सवात देवीचे मंदिर दर्शनसाठी खुले होणार असून अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. पाहूयात देवीची महती अन बरच काही...
आदिशक्ती महणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचे स्थान नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी- कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर, सह्याद्री पर्वताच्या पूर्व- पश्चिम पर्वतरांगेत डोंगर पठारावर समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर निसर्ग सौंदर्य ठिकाणी म्हणजेच सप्तशृंग गडावर आहे. सप्तशृंग म्हणजे सात शिखरे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वणी या गावापाशी जो पर्वत आहे, त्याला सात शिखरे असून एका पर्वतावरसप्तशृंगी देवीचे स्थान आहे. म्हणूनच या गडाला सप्तशृंगी गड म्हणूनही ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भगवती तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ शब्दाचाच पुढे अर्धे शक्तीपीठ असे ओळखले जाऊ लागले. तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका असे सांगितले जाते. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.
मूर्ती आणि क्षेत्रमाहात्म्य
सप्तशृंगगडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून 517 पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची अशी महाकाय स्वयंभू सप्तशृंग आईचे दर्शन घडते. श्री भगवतीचे 18 हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने वेगवेगळे आयुधे धारण केलेली आहेत. श्री भगवतीचे मूर्ती 8 फूट उंचीची असल्याने तिला 11 वार साडी लागते व चोळीला 3 मीटर खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळयात मंगळसुत्र व पुतळयाचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येतात.
ऐतिहासिक महत्त्व
सप्तशृंग गडावर वास्तव्य करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी देवी होय. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख असल्याचे सांगण्यात येते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो. की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेत असताना द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंग गड होय. तर नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केल्यानुसार निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस सप्तश्रुंग गडावर उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो, असा सप्तशृंगी देवीचा इतिहास सांगितला जातो.
सप्तशृंगी देवीचा पूजा विधी
पहाटे देवीची काकड आरतीपूजा
सकाळी साडे पाच वाजता देवीची काकड आरती केली जाते. त्यावेळी श्री सुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केले जाते. नंतर दुध व खडी साखरेचा नैवद्य दाखवून देवीची पंचाआरती केली जाते. आरती नंतर मंत्र पुष्पांजली होऊन अपराध क्षमापण स्तोत्र म्हटले जाते. ही पुजा साधरणता 15 ते 20 मिनिटांची असते.
पंचामृत महापुजा
पंचामृत महापुजा ही पुजा सकाळी सात ते नऊ या वेळेत होते. या पुजेत देवीला दही, दुध, तुप, मध, सुवासिक तेल व पिठी साखर यांची पंचामृत स्नान घातले जाते. या स्नानानंतर देवीच्या मस्तकावरून 11 लिटर दुधाचा अभिषेक श्री सुक्ताचे 16 आवर्तनाने केला जातो. मग देवीला गरम पाण्याने स्नान घालून मुर्ती वस्त्राने पुसुन कोरडी केली जाते व शेंदूर लेपण करून देवीला चोळीसह महावस्त्र (पैठणी) नेसवून कपाळावर कुंकु लावले जाते व देवीला अलंकार चढविले जातात. आरती नंतर मंत्र पुष्पाजली व अपराध क्षमापण स्तोत्र म्हटले जाते. ही पुजा दोन तासाची असते.
महानैवेद्य आरतीपूजा
महानैवेद्य आरती ही दुपारी 12 वाजता केली जाते. ह्या आरतीत श्रीसुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केले जाते. मग पुरणपोळीचा नैवद्य दाखवून पंचारती केली जाते. ही पुजा 15 ते 20 मिनिटांची असते.
सांज आरतीपूजा
सायंकाळची आरती ही सात वाजता होते. या पुजेत देवीला श्री सुक्ताचे आवर्तन करून देवीच्या पायावर हळद, कुंकु, गुलाल व अक्षदा अर्पण केल्या जातात व दुधाचा नैवद्य दाखवून पंचारती केली जाते. आरती नंतर मंत्र पुष्पांजली, अपराध क्षमापण स्तोत्र व सप्तशतीतला 4 था अध्याय म्हटला जातो. ही पुजा 30 मिनिटांची असते.