Satyajeet Tambe Call Viral : मी वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, सत्यजीत तांबे आणि मतदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
Satyaeeit Tambe Call Viral : सत्यजीत तांबे आणि मतदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Satyajeet Tambe Call Viral : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र सत्यजीत तांबे नेमके कोणासोबत? याबाबत मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी एका मतदाराने सत्यजीत तांबे यांना फोन करुन केली आहे. दरम्यान याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मत सत्यजीत तांबे यांनी वेळी या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच या निवडणुकीत अनेक घडामोडी घडत असल्याने नेमके कुणाचा कुणाला पाठिंबा याबाबत संभ्रम आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे, मात्र सत्यजीत तांबे कोणाच्या बाजूने आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळेच जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने उमेदवार सत्यजीत तांबे यांना कॉल करुन याबाबत विचारणा केली आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करु असे तांबे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये समोरील मतदाराला सांगितले आहे.
ऑडिओ क्लिपमधील संभाषण
मतदार : दादा नमस्कार
सत्यजीत तांबे : नमस्ते, बोला दादा
मतदार : दादा, मी जळगाव येथून सुनील ठाकूर बोलत आहे. दोन दिवसांपासून जे टीव्हीवर पाहतोय, यामुळं परेशान होतो, मागच्या वेळेस बाबांना मतदान केलं, पण आता तुम्ही जो फॉर्म भरला, थोडा इरिटेड झालो मी, मतदार तुमचेच आहे, पक्ष आम्हाला काही माहित नाही, शेवटी एक विषय असा आहे की जो पदवीधरांसाठी लढतो, त्याच्यामागे पदवीधर असतात. सध्या लोकांना एक प्रश्न पडलेला आहे, की जायचं कुठे?
सत्यजीत तांबे : आपले संबंध पारिवारिक आहेत, एकत्रच राहायचं, प्रश्नच येत नाही काही.
मतदार : नेमकं तुम्ही कुठं? हे लोकांना सांगायला हवं.
सत्यजीत तांबे : मी अपक्ष आहे मी काँग्रेसचाच फॉर्म भरला होता मात्र एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून अपक्ष फॉर्म भरला.
मतदार : तुमचं एक वेगळं स्थान आहे, ज्याला पक्ष नाही, अलीकडे तुमचे युट्यूबवर असंख्य फॉलोअर्स वाढले. तुमच्या फॉलोअर्सला पक्षच नाही.
सत्यजीत तांबे : हा पक्ष राजकारणाच्या पलीकडेच काम करायचा आहे मला कुठल्याही राजकारणात अडकायचं नाही मी ठरवलंय आता.
मतदार : दादा, आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच, मात्र तुमची भूमिका जाहीर होत नाही, त्यामुळे थोडा लोकांमध्ये संभ्रम आहे.
सत्यजीत तांबे : लवकर भूमिका स्पष्ट करु, हे थोडं वादळ शांत होऊ देऊ, मी वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, वादळात वादळ म्हटलं की गोंधळ होतो सगळं शांत होऊ देऊ मग बोलू आपण दोन दिवसांनी. 19 20 तारखेला बोलू आपण सगळी भूमिका सांगू आपण.