Chhagan Bhujbal : 'ओबीसी आरक्षण मिळालं' आपली लढाई संपलेली नाही, देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे आभार मानत विशेष आभार देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) मानले आहेत.
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणासाठी 9OBC Reservation) अनेक वर्षांपासून लढा देत असलेले आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये (Nashik) आज दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत विशेष आभार देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) मानले आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवाना मोठा दिलासा मिळाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष योगदान आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या (Samata Parishad) वतीने सन्मान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा अखेर सुटला. काल सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सुनावणी पार पडली यात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबिसींसाठी आजचा दिवस आनंदाचा असल्याचे आणि हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी केले. तदनंतर आज ते नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि, सरकार येतात जातात, मात्र राज्यातील मागासवर्गीय नागरिक आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच मिळणारे सरकारी फायदे , हे फायदे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लढाई करावी लागते, तेव्हा कुठं न्याय मिळतो. ओबीसी आरक्षणासाठी देखील अशाच पद्धतीने लढाई करावी लागली. मग मंडल आयोगाचा अहवाल आला, तो मान्य झाला, अनेकवेळा तो कोर्टात गेला, आणि त्यातून ओबीसींना शैक्षणिक, नोकरीत आरक्षण मिळालं. त्यानंतरच्या काळात जगभरात कोरोनाचे संकट आले. तत्पूर्वी फडणवीस सरकारच्या काळात देखील ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न झाले. त्यांनी देखील इम्पारिकल डेटा साठी केंद्रात धाव घेतली होती.तो मिळाला नाही.
नंतर महाविकास आघाडी सरकार आले. यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. आम्ही देखील इम्पॅरिकल डेटासाठी केंद्रात गेलो. केंद्राने सांगितले, डेटा आहे पण ओबीसीचा नाही, मग आयोग नेमला, पंधरा दिवसात काम करायला सांगितले, तो फेटाळला, मग चार महिन्यानंतर अहवाल आला तो मंजूर झाला. अशा पद्धतीने ओबीसी आरक्षणाचे 99 टक्के काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातील सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि विशेष आभार फडणवीस साहेबांचे, असे सांगून भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा प्रवास थोडक्यात अधोरेखित केला.
आपली लढाई संपलेली नाही!
भुजबळ यावेळी म्हणाले, आरक्षण मिळालं, मात्र आपली लढाई संपलेली नाही, ज्या अहवालामध्ये माहिती मिळवली आहे, त्यात 60 टक्के ओबीसी असताना काही गावांमध्ये 0 टक्के ओबीसी दाखविण्यात आले आहे. अनेक त्रुटी आहेत, त्यावर काम करावे लागणार आहे. याच्यापुढची लढाई, पूर्ण आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात लढाई करावी लागेल. भारत सरकारला विशेष विनंती असेल की महाराष्ट्राचा प्रश्न सुटला पण देशातील इतरही राज्यातील ओबीसींचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे.