(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Youth Murder : खळबळजनक! नाशिकमध्ये तरुणावर सपासप वार करून खून, मित्र पळाला म्हणून वाचला!
Nashik Youth Murder : नाशिकच्या म्हसरूळ परिसरात युवकाचा धारदार शस्राने खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यश गांगुर्डे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
Nashik Youth Murder : नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून दिवसाढवळ्या खून होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
किरण उर्फ यश रामचंद्र गांगुर्डे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हि घटना शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या म्हसरूळ परिसरात उघडकीस आली आहे. अधिक माहिती अशी की, नाशिक दिंडोरी रस्त्यावर म्हसरूळ जवळ आकाश पेट्रोल पंपाच्या समोरील सावरकर गार्डन जवळ यश हा उभा होता. याच वेळी संशयित मयूर शिवचरण, सुरज उर्फ बॉबी गांगुर्डे यांच्यासह इतर काही संशयितांनी वाद घातला. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी संशयितांनी सोबत आणलेल्या शस्रांनी यशवर हल्ला चढविला. यामध्ये त्यांनी यशच्या डाव्या बाजूच्या कमरेवर आणि डाव्या हाताच्या हाताच्या कोपऱ्याजवळ आणि पाठीवर चॉपरने हल्ला केला. या घटनेत यश याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र पळून गेल्याने तो वाचला.
याप्रकरणी यश याचा भाऊ विकास रामचंद्र गांगुर्डे (रा. राजवाडा, म्हसरूळ) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार खुनाचा गुन्हा म्हसरूळ पोलिसांत नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयित फरार झाले असून या प्रकरणी म्हसरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नाशिक पोलीस करताय काय?
एकीकडे नुकतेच रुजू झालेले पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे सध्या ऍक्शन मोडवर असून त्यांनी अलीकडे निर्भया पथक, ११२ हा हेल्पलाईन क्रमांक देखील नव्याने सुरु केला आहे. तर गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी विशेष गस्ती पथक देखील कार्यान्वित केले आहे. मात्र गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत, यावर उपपयोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशातच भद्रकाली पोलीस स्टेशन मधील दोन पोलिसांना लाच स्वीकारताना पकडले. यावरून नाशिक पोलिसांच चाललंय काय? गुन्हेगारी थोपवणार कोण? असे प्रश्न सध्या नाशिककर विचारत आहेत.