Nashik Crop Damage : 'शेती परवडत नाही, पण शेतीशिवाय पर्याय नाही', नाशिकच्या शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल
Nashik Crop Damage : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसाने (Heavy Rain) जवळपास 2019 हेक्टर वरील शेती पिकांचा नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवलेला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसाने शेती पिकाचे (Crop Damage) अतोनात नुकसान केल्याचे समोर आले आहे. जवळपास 2019 हेक्टर वरील शेती पिकांचा नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवलेला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील दहा दिवसात मुसळधार पावसाने झोडपून काढले. नदी नाल्यांसह विहिरी तुडुंब भरल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील धरणेही ओव्हरफ्लो झाली. सुरवातीला झालेला पावसाने पेरण्यांना वेग आला. मात्र त्यानंतर झालेला धुवांधार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 2019 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून (Nashik Krushi Department) देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात सोयाबीनसह मका, भात कांदा या पिकालाहीअतिवृष्टीचा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. त्यांनतर मका, कांदा, सोयाबीन, टोमॅटो आदींसह इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा पाऊस सुरु झाल्यानंतर पेरण्यांना वेग आला होता. मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस सुरु झाल्याने काही भागात पेरण्या खोळंबल्या होत्या. दरम्यान त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागात भात पिकाची मोठी लागवड करण्यात आली. मात्र मुसळधार पावसाने सर्व हिरावून नेले आहे. या दोन्ही तालुक्यातील भात पिकाला मोठा फटका बसला असून पिके पाण्यात गेल्याने सोडून गेल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक फटका कळवण तालुक्याला...
जिल्ह्यात सर्वाधिक फटका कळवण तालुक्याला बसला असून जिल्ह्यातील सोयाबीन मका आणि भात या तीन पिकांचं सर्वाधिक नुकसान झाला आहे त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई हाती घेण्यात आली असून लवकरच पंचनामांचा आकडा हातात आल्यानंतर मदतीबाबत सरकारकडे अहवाल पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
'शेती परवडत नाही, पण शेतीशिवाय पर्याय नाही'
दरम्यान या संदर्भात इगतपुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने भात पिकाचे नुकसान झाल्यांनतर 'शेती परवडत नाही, पण शेतीशिवाय पर्याय नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. भावली धरणाजवळील परिसरात भात शेती पूर्ण पाण्यात गेली असून जवळपास एकरी २० ते २५ हजाराचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच आता दुबार पेरणी कधी करणार? आणि केव्हा भात आवणी करणार असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
असे आहे जिल्ह्यातील नुकसान
दरम्यान दहा दवसांच्या अतिवृष्टीने जिल्ह्यात कळवण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. कळवण १५६१ हेक्टर, निफाड ३४० सेक्टर, दिंडोरी ८३ हेक्टर, सुरगाणा ५३ हेक्टर, देवळा ४० हेक्टर, बागलाण ०३ हेक्टर त्र्यंबकेश्वर ०२ हेक्टर असे नुकसान झाले आहे.